भंडारा: जिल्हा शासकीय रुग्णालयातील शिशु केअर युनिटला लागलेल्या आगीत १० चिमुकल्या बाळांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने राज्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. भंडारा जिल्हा रुग्णालयात घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. दरम्यान, मध्यरात्री 2 च्या सुमारास ही घटना घडली आहे. मात्र, या बाळांच्या आई किंवा अन्य नातेवाईकांना आपल्या बाळाला पाहू दिलेलं नाही. त्यावेळी या हतबल झालेल्या माय माउलींनी माझ्या बाळाला एकदा मला पाहू द्या असं म्हणत हंबरडा फोडला आहे.
जिल्हा शल्य चिकित्सकांच्या कार्यालयाबाहेरच बाळांच्या आई आणि नातेवाईक आक्रोश करत असल्याचे अत्यंत दु:खद चित्र भंडारा जिल्हा शासकीय रुग्णालयात पाहायला मिळत आहे. सकाळी बाळाची आईने माझ्या बाळाला एकदा मला पाहू द्या, अशी आर्त हाक रुग्णालय प्रशासनाला घातली आहे. जिल्हा शल्य चिकित्सकांच्या कार्यालयाबाहेरच या नातेवाईकांनी आपला हंबरडा फोडला आहे. पण अद्याप त्यांना आपल्या बाळांना पाहता आलेले नाही.
भंडारा जिल्हा रुग्णालयात मध्यरात्री लागलेल्या आगीत १० नवजात बालकांना दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर 7 बाळांना वाचवण्यात यश आल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाकडून देण्यात आली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मृत्यू झालेल्या लहान बाळांमध्ये एखादं बाळ अवघ्या 5 दिवसांचं आहे, तर एखादं 15 दिवसाचं.
या सर्व बाळांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. त्यामुळे बाळाच्या आईला फक्त दूध पाजण्यापूरतंच अतिदक्षता विभागात प्रवेश दिला जात होता. त्यामुळे दिवसभरात फक्त काही तासांसाठी ही बाळं आपल्या आईच्या कुशीत विसावत होती. पण शुक्रवारी मध्यरात्री काळाने घाला घातला आणि लागलेल्या आगीत 10 बाळांचा जीव गेला. दरम्यान, या घटनेमुळे राज्यातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.