नवी दिल्ली – काही देशांमध्ये कोविड रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने केंद्राने शनिवारी देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना द्रव वैद्यकीय ऑक्सिजनची उपलब्धता, सिलिंडर्स आणि व्हेंटिलेटरसारख्या उपकरणांची रुग्णालयांमध्ये पुरेशी उपलब्धता ठेवण्याची सूचना केली आहे.
आरोग्य मंत्रालयाने या सूचना करताना म्हटले आहे की, प्रेशर स्विंग ऍडसॉर्प्शन (पीएसए),ऑक्सिजन निर्माण करणारे प्लांट पूर्णपणे कार्यान्वित आहेत की नाही हे तपासणे गरजेचे आहे. ते तपासण्यासाठी नियमित मॉक ड्रिल आयोजित केले पाहिजेत, अशी सूचनाही त्यांनी केली आहे.
सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लिहिलेल्या पत्रात, आरोग्य मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव मनोहर अग्नानी यांनी म्हटले आहे की, देशात सध्या रुग्णांची संख्या कमी असली तरीही कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी या वैद्यकीय पायाभूत सुविधांचे संचालन आणि देखभाल करून तत्परता कायम राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
कोविडच्या नव्या आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी वैद्यकीय ऑक्सिजनची उपलब्धता हा महत्त्वाचा भाग आहे. त्याकडे अधिक काळजीपूर्वक लक्ष ठेवण्याच्या सूचनाही केंद्राने केल्या आहेत.