पिंपळे गुरव – काटेपूरम चौकात गुरुवारी रात्री आठच्या सुमारास रस्त्याच्या कडेला असणाऱ्या बहरलेल्या झाडावरील फांद्यावर मांजर अडकून पडले होते. अग्निशामक दलाच्या दोन जवानांनी तत्परता दाखवत झाडावरील मांजरीला सुखरूप बाहेर काढले.
काटेपूरम चौक येथे रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झाडावर मांजर अडकून पडल्याचे स्थानिक नागरिक गणेश थोरात यांच्या निदर्शनास आले. यावेळी त्यांनी त्वरित अग्निशमन दलाला संपर्क करून याबाबत माहिती दिली. काही वेळातच राहटणी येथील अग्निशमन दलाचे वाहन घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी रात्र असल्याने बॅटरीच्या साहाय्याने पाहणी करून दोन जवान राजू काळे, साईनाथ मिसाळ यांनी तत्परता दाखवत झाडावरील मांजराची सुटका केली.
या वेळी बाजारपेठेतील व्यापारी तसेच नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. उपस्थित नागरिकांनी अग्निशमन दलाच्या जवानांचे आभार मानले. यावेळी दलाचे जवान राजू काळे, साईनाथ मिसाळ, निखिल जगताप, सिनियर फायरमन अनिल वाघ, फायरमन विष्णू बुधवंत, वाहन चालक महेश पाटील यांनी हे मिशन पूर्ण केले.