बेल्हे- उंचखडक (ता.जुन्नर) येथे एका वासरावर बिबट्याने हल्ला करून फडशा पाडला. तुळशीदास पिराजी कणसे यांच्या गायांचा गोठा घराजवळ असून आज पहाटेच्या सुमारास त्यांना गायींचा ओरडण्याचा आवाज आला. ते घराबाहेर गोठ्याकडे गेले असता बिबट्याने एका वासरावर हल्ला केल्याचे दिसून आले. कणसे यांनी मोठा आरडाओरड केला असता बिबट्याने या ठिकाणाहून पळ काढला.
या ठिकाणी झालेल्या हल्ल्यात कणसे यांच्या वासराचा जागीच पडशा पाडला. दरम्यान, राजुरी उंचखडक परिसरात दिवसेंदिवस बिबट्याचे हल्ले वाढतच चालले आहेत. मळ्यात बिबट्याचे दररोज दर्शन घडत असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरात पिंजरा लावण्याची मागणी माजी सभापती दीपक औटी व सरपंच एम. डी. घंगाळे व माजी सरपंच माऊली शेळके यांनी केली आहे.