पुन्हा व्यस्त अभिषेक

बॉलीवूडच्या घराणेशाहीविषयी कितीही बोलले जात असले आणि कितीही टीका केली जात असली तरी या इंडस्ट्रीत आपल्याकडे अभिनयाचे किंवा तत्सम क्षेत्राचे कसब असल्याखेरीज इथे कुणीही दीर्घकाळ स्टार बनून राहू शकत नाही. महानायक अमिताभ बच्चन आणि अभिषेक यांचे उदाहरण यासाठी पुरेसे बोलके आहे.

बॉलीवूडच्या तीन पिढ्यांवर अधिराज्य गाजवणाऱ्या अमिताभ यांच्यासारख्या समर्थ अभिनेत्याचा वारसा लाभूनही अभिषेक बच्चनला चंदेरी नगरीत फारशी चमक दाखवता आली नाही. गेल्या काही वर्षांपासून तर तो प्रवाहाच्या बाहेरच फेकला गेल्यासारखा झाला आहे. पण त्याच्या कारकिर्दीच्या प्रवासावर आता एक सुखद वळण आले आहे.

सध्या अनुराग बसूच्या “अनाम’ या चित्रपटाबरोबरच अभिषेक “द बिग बुल’, “बॉब विश्‍वास’ यांसारख्या चित्रपटांच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. सर्वांत मोठी गोष्ट म्हणजे, बॉलीवूडचा बादशहा शाहरुख खानने आपल्या “रेड चिलीज’ बॅनरअंतर्गंत बनवण्यात येणाऱ्या तीन चित्रपटांसाठी अभिषेकला साईन केले आहे. यामुळे अभिषेकची थांबलेली गाडी आता प्रवासाला निघण्याच्या तयारीत आहे.

आपल्या 18 वर्षाच्या सिनेकारकिर्दीविषयी बोलताना अभिषेक म्हणतो की, बी-टाऊनमध्ये किती कलाकार येतात आणि जातात, पण इतकी वर्षे इंडस्ट्रीत टिकून राहणे हीच माझ्यासाठी मोठी उपलब्धी आहे. अभिषेकने अभिनयाबरोबरीने फुटबॉल आणि कबड्डी संघांच्या मालकीच्या माध्यमातून नवी वाट चोखाळली आहे. आता अभिषेक माध्यमांपासून लांब पळत नाही. उलट तो म्हणतो की, वडिलांप्रमाणे आता मलाही मीडियाची प्रशंसा आणि टीका दोन्हीही झेलता येऊ लागले आहे.’

Leave A Reply

Your email address will not be published.