समर्थ पोलिसांची कामगिरी
पुणे – समर्थ पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास मेव्हण्यासह जेरबंद केले. त्याच्याकडून 70 ग्रॅम सोने, 500 ग्रॅम चांदी आणि गुन्हयात वापरलेली स्कुटर असा 2 लाख 60 हजारांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.
जयड्या उर्फ जयवंत गायकवाड आणि विशाल आदमाने अशी अटक आरोपींची नावे आहेत. यातील जयड्यावर भोसरी व देहूरोड पोलीस ठाण्यात घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.
शहरातील मध्यवर्ती भागात मागील पंधरवड्यात अनेक ठिकाणी घरफोड्या झाल्या होत्या. यामध्ये बाजारपेठेतील काही दुकाने फोडली होती. या अनुषंगाने समर्थ आणि फरासखाना पोलीस ठाण्याची पथके आरोपींचा शोध घेत होती. दरम्यान फरासखाना पोलिसांच्या पथकाने एका आरोपीस ताब्यात घेऊन फरासखाना व खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हे उघडकीस आणले होते. समर्थ पोलिसांनाही त्यांच्या हद्दीत घरफोडी करणाऱ्या सराईत जयड्या उर्फ जयवंत गायकवाड याची माहिती मिळाली होती.
सीसीटीव्ही फुटेजवरुन तो निष्पन्न झाला होता. त्याचा माग काढला असता तो मावळ तालूक्यातील शिरगाव येथे येणार असल्याची खबर लागली. त्यानूसार तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कापूरे, पोलीस हवालदार सुशिल लोणकर, राजस शेख, संतोष काळे, पोलीस शिपाई निलेश साबळे, गणेश कोळी, सचिन पवार, अनिल शिंदे, स्वप्निल वाघोले, सुमित खुट्टे, महिला पोलिस स्मिता सिताप यांच्या पथकाने साईमंदिराजवळ सापळा रचला. तेथे तो संशयास्पदरित्या फिरताना दिसताच त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या चौकशीत त्याने समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेले गुन्हे कबूल केले. त्याने चोरीचा माल मेहुणा विशाल आदमाने याच्याकडे दिला होता. त्यालाही गुन्हयात अटक करण्यात आली आहे.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे, उपायुक्त स्वप्ना गोरे, सहायक आयुक्त मिलींद पाटील, पोलीस निरीक्षक राम राजमाने यांच्या पथकाने केली