खालापूर – कार्ला येथील एकवीरा देवीचे दर्शन घेऊन डोंबिवली येथील शाळेच्या सहलीची बस जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील बोरघाटातून जात असताना बसचा ब्रेक फेल झाला. दरीच्या दिशेने भरधाव वेगात चाललेली बस लोखंडी रेलिंग आणि झाडाला अडकली. यामुळे 64 विद्यार्थी आणि सहा शिक्षक थोडक्यात बचावले. ही घटना शुक्रवारी (दि. 6) दुपारी पावणे दोन वाजताच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, कोपर, डोंबिवली येथील च. रू. बामा म्हात्रे विद्यामंदिर या शाळेची तिसरी ते सातवीच्या विद्यार्थ्याची सहल कार्ला येथे बसने (एमएच 04 एचवाय 3571) आली होती. एकवीरा देवीचे दर्शन घेतल्यावर ही बस 6 शिक्षक व 64 विद्यार्थी यांना घेऊन जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरून खोपोलीतील गगनगिरी आश्रम येथे जात होती. बोरघाटातील शिंगरोबा मंदिराच्या पाठीमागील बाजूस आल्यावर बसचा ब्रेक फेल झाल्याचे चालकाच्या लक्षात आले. उतारावर भरधाव वेगतील बस दरीच्या दिशेने जात असताना लोखंडी रेलिंग व झाडाला धडकून उभी राहिली. या अपघातानंतर मुले भेदरली होती. शिक्षकांनी मुलांना धीर दिला.
अपघातामध्ये सुदैवाने कोणीही जखमी नाही. या बसमधील सर्वांना रुग्णवाहिकेतून गगनगिरी आश्रमात सुखरूप आणण्यात आले आहे. खोपोली पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिरीष पवार, वाहतूक शाखेच्या निरीक्षक गौरी मोरे, बोरघाट पोलीस यंत्रणेचे उपनिरीक्षक योगेश भोसले आणि महेश चव्हाण, आयआरबीचे सुरक्षा अधिकारी शिंदे, सामाजिक कार्यकर्ते कैलास गायकवाड यांनी अपघातग्रस्तांना मदत करून वाहतूक सुरळीत केली.
बसच्या फिटनेसकडे दुर्लक्ष?
कोणत्याही प्रवासाला जाण्यापूर्वी बसची तपासणी केली जाते. याबाबत कोणताही नियम नसला तरी विशेषतः शाळकरी मुलांना सहलीला नेण्यापूर्वी खबरदारी घेतली जाते. अशा प्रकारची कोणतीही तपासणी झाली नसल्याने हा अपघात घडला असावा, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. खालापूर – सहलीसाठी विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बसला बोरघाटात ब्रेक फेल झाल्याने अपघात झाला. त्यावेळी मुलांना बसमधून उतरवून सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले होते.