आळंदी – आयुष्यमान भारत पंतप्रधान आरोग्य योजनेंतर्गत आळंदी नगरपरिषदेकडून आयुष्यमान कार्ड वाटप विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. 9 ते 11 जानेवारी दरम्यान नगरपरिषद शाळा क्र. 4 जवळ हे शिबीर असणार आहे. नगरपरिषद क्षेत्रातील आयुष्यमान यादीतील नागरिकांना या शिबीरात आयुष्यमान कार्डचे वाटप केले जाणार आहे. शहरात जवळपास 1653 कुटुंबातील 5 हजारावर नागरिकांची नोदणी असून त्यांना कार्डचे वाटप केले जाणार आहे, अधिकाधिक नागरिकांनी या शिबीराचा लाभ घेण्याचे आवाहन नगरपरिषदेकडून करण्यात आले आहे.
सदर कार्डधारकांना केंद्र शासनाकडून पाच लाखांचा आरोग्यविमा मिळतो. या योजनेत 13 हजार रुग्णालयांचा समावेश असून त्याठिकाणी नागरिक उपचार घेऊ शकतात. आयसीयू, नाॅन आयसीयू, वैद्यकीय उपचार, हाॅस्पिटलायजेशन, निदान व उपचार, राहण्याची व्यवस्था, जेवण आदी सुविधा कार्डधारकांना मिळतात. आयुष्यमान कार्ड घेण्यासाठी येतेवेळी नागरिकांनी आधार कार्ड, रेशन कार्ड, मोबाईल सोबत आणावा, असे आवाहन आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी केले आहे.