भिडे पुलावर लावलेले “बोलार्ड’ रातोरात गायब 

पुणे – डेक्कन परिसरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी बाबा भिडे पुलावर लावण्यात आलेले “बोलार्ड’ रातोरात गायब झाले आहेत. हे “बोलार्ड’ काढणाऱ्या “अज्ञात’ पुणेकरांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. चारचाकी वाहने भिडे पुलाहून येत असल्याने पेठांमधील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत होती. त्यामुळे वाहतूक शाखेने या रस्त्यांवर गुरुवारी बोलार्ड बसविले. मात्र “अज्ञात पुणेकरांनी’ शनिवारपर्यंत त्यातील दोन बोलार्ड थेट गायब केले. वाहतुकीला शिस्त लावण्याच्या या प्रयत्नाला पुणेकरांनी दाद दिली नाही.

परंतु, “शिस्तप्रिय’ पुणेकरांनी शिस्तीचे नियमच ढाब्यावर बसविल्याचे दिसून आले. वाहतूक कोंडीवर आपल्या “शिस्तप्रिय’ भाषेत सल्ले देणाऱ्या पुणेकरांना वाहतुकीच्या शिस्तीमध्ये रस नसल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले.

संभाजी पुलाहून पेठांमध्ये येण्याचे अंतर वाचविण्यासाठी अनेक चारचाकी वाहनचालक भिडे पुलाचा वापर करतात. मात्र, या “शॉर्टकट’मुळे पेठांमध्ये येणाऱ्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी होते. पर्यायाने याचा फटका दुचाकी चालकांना बसत आहे. भिडे पुलावर चारचाकी वाहनांसह अवजड वाहनांना सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत बंदी घालण्यात आली होती. या नियमाचा फलक देखील लावण्यात आला होता. मात्र पुणेकरांनी या नियमाकडे “कानाडोळा’ करण्यात येत होता. बाबा भिडे पुलावर चारचाकी वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. यासाठी गुरुवारी महापालिकेकडून पुलाच्या दोन्ही बाजूस बोलार्ड बसविण्यात आले.

“वाहतुकीला शिस्त लावावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. पुलावर बसविण्यात आलेल्या बोलार्डचे नुकसान करणाऱ्या अज्ञात व्यक्तीवर वाहतूक विभागाच्या डेक्कन पोलीस शाखेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे,’ असे वाहतूक शाखेचे उपायुक्त पंकज देशमुख यांनी सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)