भाजपची निती लोकशाहीला मारक 

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची टीका 

पुणे –“इतर पक्षांतील नेत्यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी भाजप साम-दाम-दंड-भेद या नितीचा वापर करत आहे. त्यांची ही पद्धत लोकशाहीला मारक आहे,’ अशी टीका कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी शनिवारी येथे केली. त्याचबरोबर आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षातर्फे तरुण आणि महिलांना संधी देण्यासाठी आपला प्रयत्न राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने थोरात यांच्या वार्तालापाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी त्यांनी राज्यातील भाजपाचे सरकार कसे अपयशी आहे. विधानसभेच्या दृष्टीने कॉंग्रेसची तयारी कशी सुरू आहे. आघाडीबाबतच्या चर्चा कुठपर्यंत आल्या आहेत, यावर विचार मांडले.

शोरात म्हणाले, “पक्ष सोडून जाणाऱ्यांना आपण थांबवू शकत नाही पण अशाप्रकारे दहशतीच्या जोरावर पक्षात प्रवेश देणे हे योग्य नाही. गेल्या पाच वर्षात भाजपा सरकार पुर्णअपयशी ठरले आहे.विकासाचा नुसता आभास निर्माण केला जात आहे पण वस्तुस्थिती वेगळी आहे. आज राज्यात शेतकऱ्यांचे प्रश्‍न आहेत, दुष्काळी परिस्थिती असताना त्याकडे दुर्लेक्ष केले जात आहे. हे सरकार फक्त भाषणबाजीतच माहीर आहे.’

पक्षातून अनेकजण बाहेर पडल्यामुळे तरुणांना संधी मिळणार आहे. त्यामुळे पक्षातील तरुण कार्यकर्त्यांच्या दृष्टीने ही चांगली बाब आहे. राज्यातील भूमिपुत्रांना खासगी नोकऱ्यांत 75 टक्के आरक्षण देण्याबाबत कॉंग्रेस सहमत आहे. निवडणुकीच्या घोषणापत्रात याचा समावेश केला जाईल, असेही थोरात यांनी यावेळी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.