कराड – आगाशिवनगर (मलकापूर, ता. कराड) येथील अभिनव कॉलनी परिसरातील युवक सुनील सतीश कसबे शनिवारी पहाटे बेपत्ता झाला होता. बेपत्ता युवकाची दुचाकी कोयना नदीपात्रालगत आढळून आली होती. सोमवारी दि. 19 रोजी सकाळी त्याचा मृतदेह कोयना नदीपात्रात आढळून आला.
चिठ्ठी लिहून त्याने जीवन संपवल्याचे प्राथमिक चौकशीत समोर येत आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सुनील कसबे मित्रांसह डेकोरेशन व्यवसाय करत होता. तो शनिवारी दि. 17 रोजी पहाटे 4 वाजता घरातून बाहेर पडला. तो पुन्हा परत आला नाही. ही बाब कुटुंबीयांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी युवकाचा शोध सुरू केला. याप्रकरणी बेपत्ता युवकाच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. शोध सुरू असताना त्याची दुचाकी आगाशिवनगर येथे कोयना नदीपात्रालगत आढळून आली. सोमवारी त्याचा मृतदेह कोयना नदीपात्रात आढळून आला.