नागपूर –गडचिरोलीमधील चकमकस्थळी मंगळवारी आणखी एका नक्षलवाद्याचा मृतदेह आढळला. त्यामुळे त्या चकमकीत ठार झालेल्या नक्षलींची संख्या 27 इतकी झाली आहे. शोधमोहिमेवेळी सापडलेला मृतदेह सुखलाल या नक्षली म्होरक्याचा असल्याचे स्पष्ट झाले. दीर्घ काळापासून वॉन्टेड नक्षली असणाऱ्या सुखलाल याच्यासाठी 25 लाख रूपयांचे इनाम जाहीर करण्यात आले होते.
गडचिरोलीमधील जंगलात शनिवारी पोलीस कमांडो आणि नक्षलींमध्ये जोरदार चकमक झडली. चकमकीच्या दिवशी 26 नक्षलींचा खात्मा झाल्याचे जाहीर करण्यात आले. चकमकीनंतर संबंधित परिसरात सुरक्षा दलांकडून शोधमोहीम राबवली जात आहे. आणखी काही नक्षलवाद्यांचे मृतदेह हाती लागण्याच्या किंवा काही नक्षलवादी दडून बसले असण्याच्या शक्यतेतून ती मोहीम सुरू आहे.