महाबळेश्वर, (प्रतिनिधी)- येथील एस.टी स्टॅण्डजवळ तीस वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. महाबळेश्वर ट्रेकर्सच्या जवानांच्या सहकार्याने देवळी मुऱ्हा येथील संजय भगवान शिंदे यांचा हा मृतदेह अडगळीतून बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयामध्ये काल नेण्यात आला.
याबाबत पोलीसांकडून मिळालेल्या माहितीवरुन एसटी स्टॅण्डच्या बाजूला अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत असलेल्या बोळामधून उग्र वास येत होता. एसटी कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी जाऊन बघितले असता बसलेल्या अवस्थेत एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. कर्मचाऱ्यांनी पोलीस प्रशासनास याबाबतची माहिती दिली.
पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांच्या सूचनेनुसार हवालदार नवनाथ शिंदे, सचिन जांभळे आदींसह महाबळेश्वर ट्रेकर्सचे जवान सुनीलबाबा भाटिया, अमित कोळी, सुजित कोळी, ओंकार नाविलकर यांच्यासह महेश गुजर, संतोष पवार यांनी मृतदेह अडगळीतून बाहेर काढल्यानंतर तो ग्रामीण रुग्णालयामध्ये नेण्यात आला.
संजय शिंदे काही दिवसांपासून बेपत्ता असल्याचे पोलिसांना काही स्थानिकांनी सांगितल्याने पोलिसांनी संजय शिंदे यांच्या नातेवाइकांशी संपर्क साधला. सायंकाळी या मृतदेहाची ओळख पटविण्यात यश आले. अंदाजे पाच ते सहा दिवसांपूर्वी संजय शिंदे कामासाठी बाहेरगावी जात असल्याचे सांगून घरातून निघाला. येथील बाजारपेठेत आला होता. रात्री उशिरा शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.