ओतूर (पुणे)- संपूर्ण दिवसभर बेपत्ता असलेल्या ज्योतिनाथचा मृतदेह घरापासून काही अंतरावर असलेल्या मांडवी नदीपात्रात आढळून आला आहे.
जुन्नर तालुक्यातील ओतूर (शिवाजी रोड) येथे राहणारा दहा वर्षाचा ज्योतिनाथ सोमेश्वर सूर्यवंशी (वय 10) हा मुलगा गुरुवारी (दि. 27) सकाळी 11 वाजेपासून खेळायला जातो असे सांगून घराबाहेर निघून गेला तो रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने त्याचे पालकांनी ओतूर पोलीस ठाण्यात मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार नोंद केली होती. तत्पूर्वी त्यांनी ज्योतिनाथचा नेहमीच्या मित्रांकडे व नातेवाइकांकडे शोध घेतला. येथील शिवाजी गणेशोत्सव मंडळ व जय दुर्गाशक्ती नवरात्र मंडळाचे सुमारे 100 कार्यकर्त्यांनी शोध मोहीम हाती घेऊन कसून शोध घेतला. शुक्रवारी (दि. 28) सकाळी मांडवी नदीच्या किनाऱ्यावर शोधकाम सुरू केले असता ज्योतिनाथचे कपडे एका झुडपाजवळ आढळून आल्याने पाणबुडे व मासेमारी करणाऱ्या युवकांच्या मदतीने शोध घेण्यात आला असता त्याचा मृतदेह नदीपात्रात मिळून आला. अधिक तपास ओतूर पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक परशुराम कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक विकास गोसावी करीत आहेत.