श्रीनगर – सुरक्षा दलांनी आज दक्षिण काश्मीरमधील चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्याशिवाय, चकमकीदरम्यान एका दहशतवाद्याने शरणागती पत्करली.
शोपियॉं जिल्ह्यातील किलुरा भागात दहशतवाद्यांचे अस्तित्व असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली. त्यानंतर दहशतवाद्यांच्या शोधासाठी मोहीम हाती घेण्यात आली.
त्यावेळी सुरक्षा जवानांना पाहून दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्याला सुरक्षा जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिल्याने दोन्ही बाजूंमध्ये चकमक झडली. त्यामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा करून सुरक्षा दलांनी मोठे यश मिळवले. ठार झालेल्या दहशतवाद्यांकडील दोन एके रायफल्स, तीन पिस्तूल आणि दारूगोळा साठा जप्त करण्यात आला.
चालू वर्षात सुरक्षा दलांनी जम्मू-काश्मिरात धडक मोहिमा राबवून अनेक दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्यामुळे दहशतवादी संघटनांना जबर हादरा बसला आहे.