मुंबई – महाराष्ट्रात आता पर्यंत भाजप पक्षाच्या जाहिरातीत ‘देशात नरेंद्र अन् राज्यात देवेंद्र’ हे वाक्य वाचायला ऐकायला मिळत होते. मात्र आता शिवसेनेकडून जाहिरातीमध्ये ‘राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ असे छापून आल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
अशात केंद्रात नरेंद्र आणि राज्यात नरेंद्र ही घोषणा मागे पडलीय का? तसेच नरेंद्र-देवेंद्र ऐवजी मोदी-शिंदे हे बदलेलं समीकरण आवडलं का? असा प्रश्न माध्यमांच्या प्रतिनिधींनी बावनकुळे यांना विचारला. यावर भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ‘एकनाथ शिंदे हे राज्याचे प्रमुख आहे. या सरकारचे प्रमुख आहेत. तर नरेंद्र मोदी हे देशाचे प्रमुख आहेत. त्या आशयाने जाहिरातीत तसं लिहिलं असावं.’
ते पुढे म्हणाले,’या राज्यातल्या जनतेने दोन वेळा देवेंद्र फडणवीस यांना पसंती दिली आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी आतापर्यंत चांगलं काम केलं आहे. आधीच्या सरकारमध्येही त्यांनी चांगलं काम केलं होतं. मुळात कोण मोठं, कोण लहान हे शिवसेना भाजपात महत्त्वाचं नाही.’
दरम्यान, ‘राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ या शिवसेनेकडून करण्यात आलेल्या जाहिराती मुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. जाहिरातीमध्ये सुरुवातील ‘राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ लिहिले असून त्याखाली अफाट प्रेम मिळते आहे जनतेचे असे लिहिण्यात आले आहे. या जाहिरातीमध्ये मतदान सर्वेक्षणाची टक्केवारी देण्यात आली आहे.
दरम्यान यावर भाजप नेते अतुल भातळकर यांनी प्रतिकिया दिली असून ते म्हणाले,’आमचे सरकार पुन्हा बहुमताने निवडून येणार असल्याचे या सर्व्हे मधून समोर आले आहेत. मात्र देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र अशी जाहिरात आम्ही कधीच दिली नव्हती.
तर जाहिरातमध्ये देशात नरेंद्र आणि राज्यात शिंदे असा उल्लेख आहे. विशेष म्हणजे खुद्द देवेंद्र फडणवीस यांनीच आगामी निवडणुका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही लढवणार असल्याचे जाहीर केले असल्याचे भातळकर म्हणाले.