- भाजपाच्या सारीका नाईकनवरे यांची
देहूरोड कॅंटोन्मेटच्या उपाध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड - कॉंग्रेस सदस्याला उपाध्यक्ष पदाचे गाजर गाफील ठेवल्याने तणावपूर्ण वातावरण
- राज्यात तर स्थानिक बोर्ड निवडणुकीच्या वाटाघाटीत नाट्यमय घडामोडी
देहूरोड – देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाच्या उपाध्यक्ष पदाची परंपरा भाजपाने मोडीत काढून कॉंग्रेस सदस्यांना गाफील ठेवत निवडणुकीत तीन विरुद्ध चार अशा मताधिक्याने भाजपाच्या सारिका नाईकनवरे यांची दुसऱ्यांदा निवड करण्यात आली. राज्याच्या निवडणुकीतील सोडाच, पण स्थानिक देहूरोडच्या विकासासाठी एकत्रित समझोत्याने उपाध्यक्ष पदाची असलेली परंपरा भाजपाने मोडून विश्वासघात केल्याची संतप्त प्रतिक्रिया उपाध्यक्ष पदाचे प्रमुख दावेदार हाजीमलंग मारीमुत्तू यांनी व्यक्त केले आहे.
देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाची शुक्रवारी (दि. 15) विशेष सभा घेण्यात आली.सभेच्या अध्यक्षस्थानी ब्रिगेडियर संजय खन्ना होते. मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरूप हरितवाल, उपाध्यक्ष रघुवीर शेलार, सदस्य सारिका नाईकनवरे, गोपाळराव तंतरपाळे, विशाल खंडेलवाल, ललित बालघरे, ऍड. अरुणा पिंजण आदी यावेळी उपस्थित होते.
उपाध्यक्ष निवडी संदर्भात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. नाट्यमय घडामोडींमुळे सभेत तणावपूर्ण वातावरण होते. दीड महिन्यापूर्वी कॅंटोन्मेंट बोर्डाच्या बैठकीत कॉंग्रेसचे बोर्ड सदस्य हाजीमलंग मारीमुत्तू यांनी देहूरोडच्या विकासासाठी बोर्डात समझोत्याने सर्वाना उपाध्यक्ष पदाची परंपरा असल्याची व्यक्त करीत पदासाठी दावा केला होता. मात्र त्यावेळी भाजपाचे असणाऱ्या सदस्यांनी या संदर्भात असणारा निर्णय पक्षश्रेष्ठीवर असल्याचे म्हटले होते.
बोर्डाची परंपरा राखत एक महिन्यासाठी का होईना, उपाध्यक्षपद देण्याची विनंती कॉंग्रेसने केल्याने मावळातील भाजप नेत्यांनी उपाध्यक्षपद दिले जाईल, असा शब्द दिला होता. मात्र विधान सभेच्या निवडणुकीमुळे भाजपाचे बंडखोर असणारे सदस्य शेलार यांना उपाध्यक्ष पद दिले होते. करोनाच्या काळाने सहा- सहा महिन्याने दोन वेळा बोर्ड सदस्यांचा कार्यकाल वाढला. मात्र शेवटचे कमी दिवस उरले असताना ही भाजपाचे शेलार यांनी उपाध्यक्ष पदाचा राजीनामा न दिल्यास अविश्वास ठराव मांडण्याची चर्चा बैठकीत झाली हाेती. मात्र त्यानंतर आठ जानेवारी रोजी शेलार यांनी उपाध्यक्षपदाचा त्याग करताना देताना राजीनामा पत्रकावर 11 जानेवारी अशी तारीख नमूद केले होते.
भाजपाच्या काही सदस्यांनी देहूरोडच्या विकासासाठी बोर्ड उपाध्यक्ष पदाची असलेली परंपरा राखण्यासाठी आणि पक्षश्रेष्ठीने दिलेले शब्दानुसार कॉंग्रेसच्या मारीमुत्तू यांना गाफील ठेवले. सुट्ट्यांची दिवसामुळे अखेर विशेष सभा शुक्रवारी घेण्यात आली. या सभेत कॉंग्रेसचे मारीमुत्तू यांची निवड निश्चित असल्याने त्यांच्या समर्थकांनी कार्यालयाच्या आवारात गर्दी केली होती.
बोर्डाच्या बैठकीच्या प्रारंभीला बोर्डातील काही विषयांवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर अखेर निवडीच्या मुख्य प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. बोर्डाच्या बैठकीपासून अखेरपर्यंत भाजपाच्या दोघा सदस्यांच्या चेहऱ्यावर नाराजी असल्याचे दिसून येत होते. नाट्यमय घडामोडींनंतर उपाध्यक्ष निवडीसाठी कॉंग्रेसचे तंतरपाळे यांनी सदस्य मारीमुत्तू यांचे नाव सुचवले, तर नाईकनवरे यांचे नाव शेलार यांनी सुचविले. बहुमत नसल्यामुळे दोघांच्या अर्जामुळे गुप्त पद्धतीने मतदान घेण्याची प्रक्रिया घेण्यात आली.
गुप्त मतदानाने झालेल्या प्रक्रियेत नाईकनवरे यांना सात पैकी चार मते, तर हाजीमलंग यांना तीन मते मिळाल्याने नाईकनवरे यांची निवड झाल्याचे अध्यक्ष खन्ना यांनी जाहीर केले. सहा वर्षांतील दुसऱ्यांदा उपाध्यक्षपदी नाईकनवरे यांना संधी मिळाली.
गत पंचवार्षिकमध्ये राष्ट्रवादीची चार, कॉंग्रेसचे दोन आणि भाजपाचे एकटे असणारे सदस्य संजय राऊत यांना ही उपाध्यक्षपद देण्यात आले होते. मात्र यंदा असणाऱ्या पंचवार्षिकेत भाजपाचे चार, भाजप बंडखोर एक, कॉंग्रेसचे दोन असे सदस्य निवडून आले होते. भाजपाचे बहुमत असल्याने देहूरोडच्या विकासासाठी कॉंग्रेसने बहुमतात राहण्याचे निर्णय घेत भाजपाचे समर्थन केले होते. मात्र भाजपाने मतांच्या राजकारणासाठी बंडखोर यांना उपाध्यक्षपद देत कॉंग्रेसला उपाध्यक्ष पदाची गाजर दाखवले.
वाढीव मिळालेल्या एक वर्षातील शेवटच्या पंचवीस दिवसासाठी सुद्धा अखेर उपाध्यक्ष पदाच्या निवडीवर परंपरा मोडीत काढत भाजपाने कॉंग्रेसला गाजर दाखवत विश्वासघात केल्याचा आरोप कार्यालयाच्या प्रांगणात अभिनंदन करण्यासाठी शाल, श्रीफळ पुष्पहार घेऊन वाट पाहणाऱ्या हाजीमलंग मारीमुत्तू यांच्या समर्थकांसह महाआघाडीच्या कार्यकर्त्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केले.
कॅंटोन्मेंट बॉर्डामध्ये कोणतीही ही परंपरा नाही. गतपंचवार्षिकमध्ये दोन भाजप पुरस्कृत व एक अधिकृत सदस्य होते. कोणत्याही पक्षाचे बहुमत नसल्याने वाटाघाटीने उपाध्यक्षपद झाले होते. पक्षश्रेष्ठी आणि कोअर कमिटीच्या निर्णयाने भाजपाच्या नाईकनवरे यांना उपाध्यक्ष केले आहे.
– रघुवीर शेलार, माजी उपाध्यक्ष