शिक्रापूर -पुणे जिल्ह्यातील 575 गावांत मुलांच्या तुलनेत मुलींचे प्रमाण कमी असल्याचे पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने केलेल्या पाहणीत समोर आले आहे. तर जिल्ह्यात शून्य ते सहा वर्षे वयोगटात एक हजार मुलांच्या तुलनेत 941 मुली असल्याचे आढळून आले आहे. 2011 च्या जणनगणेचा विचार करता या वेळी जिल्ह्यातील मुलींचे प्रमाण वाढले आहे.
ते मागील वेळी प्रति हजार मुलांमागे 883 मुली होत्या. पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने बाल आरोग्य तपासणी मोहीम राबवण्यात आली आहे. या मोहिमेत जमा झालेल्या माहितीचे विश्लेषण केल्यानंतर जिल्ह्यातील 575 गावे ही बाल लिंग गुणोत्तराच्या निकषाच्या आधारे रेडझोनमध्ये आहेत. या निकषानुसार प्रति हजार मुलांमागे मुलींची संख्या ही 940 ते 950 इतकी असली पाहिजे. रेडझोन मधील गावांत मुलींची संख्या प्रति हजार मुलांमागे 912 पेक्षा कमी आढळून आली आहे. तर आरोग्य तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा परिषदेने तीन गट केले आहेत. ज्या गावांत मुलींची संख्या 949 किंवा त्यापुढे आहे अशा गावांना ग्रीन झोनमध्ये टाकले आहे. जिल्ह्यातील ज्या गावांत मुलींची संख्या प्रति हजार मुलांमागे 912 ते 948 इतकी आहे. अशा गावांचा ऑरेंज झोनमध्ये समावेश केला आहे.
जिल्ह्यातील तालुक्यांचा विचार करता दौंड, हवेली तालुके रेडझोनमध्ये आहेत. तर आंबेगाव, शिरूर, खेड, मावळ हे तालुके ऑरेंज झोनमध्ये आणि मुळशी, वेल्हा, भोर, बारामती, इंदापूर, जुन्नर हे तालुके ग्रीन झोनमध्ये आहेत. 575 गावे रेडझोनमध्ये असून 111 गावे ऑरेंज झोनमध्ये आणि 686 गावे ग्रीन झोनमध्ये आहेत. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने प्रत्येक घरात, तात्पुरत्या आसऱ्यासाठी उभारलेल्या ठिकाणी जाऊन पाहणी केली आहे. प्रत्येक बालकाची आरोग्य तपासणी केली गेली. ही पाहणी 36 निकषांवर केली आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे 3 लाख 28 हजार बालके आढळून आली. त्यापैकी 3 लाख 11 हजार बालकांची आरोग निरीक्षकांकडून तपासणी केली गेली आहे. तसेच सहा तज्ज्ञांमार्फत ही तपासणी केली गेली आहे.
केंद्र, राज्य सरकारचे विविध उपक्रम आणि कायदे प्रभावीपणे राबविण्यात आले आहेत. त्याचा सकारात्मक परिणाम म्हणून बाल लिंग गुणोत्तर 2011 मधील 883 वरून 2022 मध्ये 941 पर्यंत वाढविण्यात मदत झाली आहे. बाल लिंग गुणोत्तर आणखी सुधारण्यासाठी आणि स्त्रीभ्रूणहत्या किंवा बालिका हत्येची कोणतीही प्रथा नाहीशी करण्यासाठी आम्ही आशा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून माता आणि कुटुंबांचे समुपदेशन करीत आहोत.
– आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पुणे