शिक्रापूर (प्रतिनिधी) – कम्युनिटी पोलिसींग म्हणजे सेवाभावाने समाजातील सर्व स्तरातील लोकांबरोबर संवाद वाढवून एकात्मतेची भावना वाढीस लावणे आणि समाजातील गुन्हेगारी वृत्तीला आळा घालून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे हा कम्युनिटी पोलिसींगचा मुख्य उद्देश असून यामुळेच कम्युनिटी पोलिसींग कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी उत्तम पर्याय आहे. असे मत पुणे जिल्हा ग्रामीण पोलीसचे अधिक्षक संदीप पाटील यांनी व्यक्त केलं.
पुणे जिल्ह्यात भीमा कोरेगाव येथील दंगल, औद्योगिक क्षेत्रात अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीचा झालेला शिरकाव, कोरोना सारख्या महामारीचं संकट या आणि अशा अनेक आव्हानांना तोंड देण्यासाठी संवाद हा गरजेचा आहे असं मत पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी पुणे ग्रामीण पोलीसांनी केलेल्या मागील काही वर्षातील कम्युनिटी पोलिसींग मधील कामाची माहिती देणाऱ्या चित्रफितीच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केलं.
या चित्रफितीचे डायरेक्टर व लेखक गौतम कोतवाल हे याप्रसंगी पुणे ग्रामीण पोलिसांनी केलेल्या कार्याबद्दल बोलताना ते म्हणाले की लोकांमध्ये एकात्मतेची व समानतेची भावना निर्माण केल्यास भीमा कोरेगाव सारखा अतिशय संवेदनशील प्रश्न ही अतिशय सहजतेने हाताळला जातो हे पुणे ग्रामीण पोलिसांनी दाखवून दिलं आहे.
सदर चित्रफितीचं प्रकाशन पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील, ग्रीन वर्ल्डचे अध्यक्ष गौतम कोतवाल, पोलीस निरीक्षक जिल्हा विशेष शाखा नारायण पवार, सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग गायकवाड, कार्यालय अधीक्षक रविंद्र महाले या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं.
तर सदर चित्रफितीचं निर्मितीसाठी पोलीस निरीक्षक नारायण पवार, उप अधीक्षक मुख्यालय लंभाते यांचं मोलाचं सहकार्य लाभले असून खेड पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गुरव, शिक्रापूर पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार, लोणीकंद पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, रांजणगाव पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश कुमार राऊत, हवेली पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शेळके, यांचे विशेष सहकार्य मिळाले.