लंडन – करोना विरोधात फायझर बायोन्टेकच्या लसीला मान्यता देणारा ब्रिटन हा पहिला देश ठरेल. मात्र करोना विरोधातील लढाई अजूनही संपलेली नाही, असा इशारा ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी दिला आहे.
जॉन्सन यांनी दीर्घकाळ केलेल्या संशोधनाबद्दल संशोधकांचे अभिनंदन केले आहे. मात्र आगामीकाळात थंडीचे दोन महिने असल्याने करोनाच्या प्रादुर्भावामुळे मृत्यूची शक्यता असलेल्या गंभीर प्रकृतीच्या रुग्णांनाच फायझर बायोन्टेकच्या लसीचे दोन डोस देण्यात येणार आहे. त्यामुळे या लसीबाबत नागरिकांनी फाजील आशावाद बाळगू नये, असे आवाहनही जॉन्सन यांनी केले आहे.
ब्रिटनमधील बहुतांश भागाला अजूनही करोनाचा धोका कायम आहे.
तिथे सध्या थंडीच्या हंगामासठी लॉकडाऊनचा “कोल्ड विंटर प्लॅन’लागू केला गेला आहे. नागरिकांनी या कार्यक्रमाची व्यवस्थित अंमलबजावणी करावी. कारण अजूनही “गेम ओव्हर’ झालेला नाही. आपण निश्चिंत राहिलो तर हा प्रादुर्भाव पुन्हा वाढू शकतो, असे जॉन्सन यांनी म्हटले आहे.