ख्राईस्टचर्च – ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाने रविवारी इंग्लंड महिला संघाचा महिला विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम लढतीत 71 धावांनी पराभव केला व विक्रमी सातव्यांदा विजेतेपद पटकावले.
ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा लाभ घेत 50 षटकात 356 धावांचा डोंगर उभा केला. विजयासाठी 357 धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना इंग्लंडनेही कडवी लढत दिली. नतालिया स्किव्हरने जिद्दी खेळी करत शतक फटकावले. मात्र, तिला अन्य फलंदाजांची साथच लाभली नाही. स्किव्हरने 148 धावांची जिद्दी केली केली. त्यात तीने 121 चेंडूत 15 चौकार व 1 षटकार अशी आतषबाजी केली.
टॅमी ब्युमोंटने 27, कर्णधार हेदर नाईटने 26, सोफिया डंक्लेने 22, शार्लेट डीनने 21 व ऍमी जोन्सने 20 धावा केल्या. मात्र, त्या संघाचा पराभव टाळू शकल्या नाहीत. ऑस्ट्रेलियाकडून अलाना किंग व जेस जॉन्सन यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. मेघन शुटने 2 बळी घेतले. ऍश्ले गार्डनर व तहिला मॅकग्रा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
तत्पूर्वी, इंग्लंडची कर्णधार हेदर नाईटने नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजी दिली. सलामीवीर व आक्रमक फलंदाज एलिसा हिलीने ( Alyssa Healy ) कारकीर्दीतील सर्वोत्तम खेळी केली. तीने अंतिम सामन्यात 137 चेंडूत 26 चौकारांच्या मदतीने 170 धावांची अविस्मरणीय खेळी केली. तीला सुरेख साथ देत रशेल हेन्स 68 व बेथ मुनी 62 यांनी अफलातून खेळी केली.
हिलीचे वर्चस्व
एलिसा हिलीने यंदाच्या स्पर्धेत पाचशेपेक्षा जास्त धावा करत संपूर्ण वर्चस्व राखले. तीच्या या कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियाच्या संघाने विक्रमी सातवे विजेतेपद साकार केले. हिलीने यंदाच्या स्पर्धेत जवळपास प्रत्येक लढतीत यष्टीरक्षणासह फलंदाजीतही सातत्य राखताना आपले वर्चस्वही सिद्ध केले. यापूर्वी ऑस्ट्रेलियाने 1978, 1983, 1988, 1997, 2005 व 2013 साली ही स्पर्धा जिंकली होती. इंग्लंडने 1973, 1993, 2009 व 2017 अशी चारवेळा या स्पर्धेचे विजेतेपद मिळवले आहे. यंदाही त्यांनी चांगली वाटचाल केली होती मात्र, यंदाच्या स्पर्धेच्या अंतिम लढतीत त्यांच्या फलंदाजांनी निराशा केली.
या कामगिरीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 356 धावांचा डोंगर उभा केला. हीलीने या स्पर्धेतील सलग दुसऱ्या सामन्यात शतकी खेळी केली आहे. तीने वेस्ट इंडीज विरुद्धच्या उपांत्य सामन्यात तिने शतकी खेळी केली होती. या स्पर्धेच्या इतिहासात तब्बल सहावेळा विजेतेपद पटकावलेल्या ऑस्ट्रेलियाने या सामन्यातही दर्जाला साजेसा खेळ करत विक्रमी सातवे विजेतेपद साकार केले.
संक्षिप्त धावफलक –
ऑस्ट्रेलिया – 50 षटकांत 5 बाद 356 धावा. (एलिसा हिली 170, रशेल हेन्स 68, बेथ मुनी 62, ऍना श्रुबसोल 3-46). इंग्लंड – 43.4 षटकांत सर्वबाद 285 धावा. (नतालिया स्किव्हर 148, टॅमी ब्युमोंट 27, हेदर नाईट 26, सोफिया डंक्ले 22, शार्लेट डीन 21, ऍमी जोन्स 20, जेस जॉन्सन3-57, अलाना किंग3-64, मेघन शुट2-42).