पुणे -राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तरुणाला करण्यात आलेली अटक ही बेकायदेशीर असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. लोक अभिरक्षक कार्यालयाने ही बाब न्यायालयाच्या निदर्शनात आणून दिल्यानंतर आरोपी तरुणाची त्वरित सुटका करण्यात आली.
या प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात आरोपीला अटक करताना पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली नाही, असे नमूद करीत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी चंद्रशीला पाटील यांनी आरोपीची 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सुटका केली. प्रशांत दशरथ पाटील (24) असे आरोपीचे नाव आहे.
या प्रकरणी त्याला कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथून अटक करण्यात आली होती. या तरुणाने भुजबळ यांच्या कार्यालयातील एका कार्यकर्त्यांच्या मोबाइलवर फोन करून भुजबळ यांना जीवे मारण्याची सुपारी मिळाल्याचे सांगितले. त्या कार्यकर्त्याने पुणे पोलिसांना हा प्रकार कळवला. त्यानंतर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने आणि कोरेगाव पार्क पोलिसांनी त्या तरुणाला महाड येथून ताब्यात घेतले. अटक झाल्यानंतर आरोपीने वकील न पुरविल्याचे त्याला त्याची बाजू मांडण्यासाठी विधी सेवा प्राधिकरणामार्फत मोफत वकील पुरविण्यात आला होता. लोक अभिरक्षक कार्यालयाचे विधीज्ञ ऍड. सचिन साळुंके यांनी आरोपीची बाजू मांडली. तो ग्राह्य धरीत न्यायालयाने आरोपीला सोडण्याचे आदेश दिले.