उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा आदेश 30 नोव्हेंबरपर्यंत प्रक्रिया लांबली
महाविद्यालयांचा संभ्रम दूर होणार
विद्यार्थी परिषद निवडणुका पुढे ढकलण्याबाबत शासनाकडून अधिकृत आदेश विद्यापीठाला प्राप्त झाले आहेत. यामुळे आता महाविद्यालयांनाही त्याबाबत परिपत्रक काढून माहिती देण्यात आली आहे, असे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. सदानंद भोसले यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे आता महाविद्यालयांचा संभ्रम दूर होणार आहे.
पुणे – राज्यातील विद्यापीठ व महाविद्यालयांमधील विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने घेतला आहे. याबाबतचे अधिकृत आदेश नुकतेच जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे निवडणूक वातावरणाने तापलेला हा आखाडा पुन्हा शांत झाला आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह राज्यातील बहुसंख्य विद्यापीठातील विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका या ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये घेण्याबाबतचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. मात्र, विधानसभेची निवडणूक आचारसंहिता सप्टेंबरमध्ये लागू होणार आहे.
विधानसभा व विद्यार्थी परिषद या दोन्ही निवडणुका एकाच वेळी आल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता मंत्रिमंडळ बैठकीत वर्तविण्यात आली. शिवाय पूरपरिस्थितीमुळेही या निवडणुका पुढे ढकलण्याशिवाय पर्याय नसल्याची मते मंत्र्यांनी मांडली होती.