पिंपळे गुरव – सकाळच्या प्रहरी देवाचे नामस्मरण करत पोतराज, वासुवेद दिसत असे. आता सोशल मीडियाच्या या जमान्यात त्यांचे दर्शन दुलर्भ झाले आहे. नुकतेच परिसरात पोतराजाचे दर्शन झाल्याने पूर्वीच्या काळाची पुन्हा एकदा आठवण झाली. पुढील पिढीकडे ही कला सोपवण्याऐवजी शिक्षण, नोकरीकडे त्यांचा कल असल्याचे बोलण्यातून जाणवले.
पूर्वी पहाटेच्या प्रसन्न वातावरण वासुदेव, पोतराज देवाची गाणी गात सर्वांना जागविण्याचे काम करत. पोतराज डोईवर देवीचा देव्हारा घेऊन गल्लोगल्ली फिरत. दारी आलेल्या या पोतराजाचे महिला भक्तिभावाने पूजन करून त्यांच्या पदरी शिधा घालत असे. धान्य, पीठाचा जोगवा देऊन देवीची ओटी भरत. पोतराज अंगावर आसूड ओडून भक्ताची मनोकामना पूर्ण होण्याचा आशिर्वाद देत असे. मिळालेल्या शिधामधून त्यांचाही उदरनिर्वाह होत असे. मात्र, आज त्यांना आपला उदरनिर्वाह करणे कठिण झाले आहे.
ग्रामीण संस्कृतीत लोककलावंतांना मोठा मान होता. आजच्या स्मार्ट फोनचा जमान्यात लोककला आणि कलावंत लोप पावताना दिसत आहे. पूर्वी पोतराज गावोगावी फिरत. काही भाकिते सांगत. लोक त्यावर विश्वास ठेवत. आताची परिस्थिती बदलली आहे. नियमित दिसणारे हे पोतराज आता संक्रात, दसरा, दिवाळीच्या सणाला क्वचित दिसतात.
कला जोपासताना आर्थिक स्थैर्य नाही. शासन दरबारी दखल घेतली जात नाही. त्यामुळे उपासमारीची वेळ येते. त्यामुळे पारंपरिक काला जोपासण्याऐवजी मुलांच्या शिक्षणाकडे ओढा आहे. त्यातून नोकरी मिळून किमान चार पौसे मिळतील व अंगावर आसूड मारून घेण्याची वेळ येणार नाही, असे पोतराजाने सांगितले.
मात्र, सध्या पुन्हा तीच परिस्थिती ओढावताना दिसते. करोनामुळे नोकरीही मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे पुन्हा दारोदारी फिरण्याची वेळ आली आहे. मात्र, त्यातून कुटुंबाचा सांभाळ करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. लोकांनी पारंपरिक लोककलावंतांकडे कलोपासक म्हणून पहावे, अशी अपेक्षा पोतराजाने व्यक्त केली.