पुणे -एखादी समस्या सोडविण्यासाठी केवळ पैसाच नाही, तर अनुभव आणि ज्ञानाचा फायदा करून घेतला तर समस्या सुटतेच; मात्र, त्या सोबतच पर्यावरणसंवर्धनालाही हातभार लागू शकतो, याचा प्रत्यय महापालिका प्रशासनाला आहे. जंगली महाराज रस्त्यावर पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच पूरस्थिती उद्भवल्यानंतर या पूरस्थितीच्या मुळाशी जात महापालिकेने हनुमान टेकडी आणि फर्गसन महाविद्यालयाच्या परिसरात पाणीसाठ्यासाठी खोदलेल्या चऱ्यांमुळे तब्बल एक कोटी 10 लाख लिटर पाणी जमिनीत जिरणार आहेच. परिणामी जंगली महाराज रस्त्यावर यंदा पूर येणार नाही, अशी अपेक्षा आहे.
पूरस्थिती रोखण्यासाठी अशा प्रकारचे काम पहिल्यांदाच करण्यात आले आहे. पावसळ्यात त्यामुळे एक कोटी 10 लाख लिटर पाणी अडविणे शक्य होणार आहे. तर हे पाणी जमिनीत मुरण्यास मुदतही होणार असून, शहरातील अन्य टेकड्यांच्या ठिकाणीही याबाबत नियोजन सुरू आहे, असे पुणे महापालिकेचे ड्रेनेज विभाग प्रमुख श्रीधर येवलेकर म्हणाले.
पाण्याच्या मार्गावर चरखोदाई
गेल्या काही वर्षांत शहरातील टेकड्यांच्या परिसरात कमी वेळात जास्त पाऊस होतो. शहरात टेकड्यांच्या पायथ्याशी नाले होते. मात्र, कालांतराने हे नाले अतिक्रमणांमुळे बुजविण्यात आले. तर काही ठिकाणी ते वळविण्यात आले. परिणामी टेकडीवरून येणारे पाणी थेट रस्त्यावर येते. मागील वर्षी फर्गसन महाविद्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या टेकडीवरून अशाच प्रकारे पाणी महाविद्यालयाच्या आवारात आले. तर उताराने नंतर हे पाणी फर्गसन रस्त्यावरून पलीकडे घोले रस्त्याने जंगली महाराज रस्त्यावर आले. त्यानंतर बालभारतीपासून हे पाणी बीएमसीसी रस्त्याने आपटे रस्ता आणि जंगली महाराज रस्त्यावर आले होते.
अशी आहे उपाययोजना…
- फर्गसन महाविद्यालयाच्या टेकडीच्या खालील बाजूस आणि महाविद्यालयाकडे येणाऱ्या कच्च्या रस्त्यावर चर खोदाई.
- चराची एकूण लांबी 1800 मीटर.
- रुंदी दीड मीटर, खोली सव्वा मीटर.
- एकूण पंधरा चरांची खोदाई.
- याशिवाय पाच तलावांची निर्मिती.
- महाविद्यालयाच्या एका जुन्या तलावाचाही समावेश.
- ठिकाणी असलेल्या खाणीचीही खोदाई.
- महाविद्यालयाच्या आवारातील दोन तळ्यांतील गाळउपसा.
- या सर्व खोदाईमुळे जवळपास एक कोटी 10 लाख लिटर पाणी साठवण क्षमता तयार.
- मोठ्या प्रमाणात पाऊस झाला तरी या ठिकाणी हे पाणी जमिनीत मुरणार.
- त्यामुळे पावसाचे पाणी थेट रस्त्यावर येणार नाही.
- परिणामी जंगली महाराज रस्त्यावर यंदा पूरस्थिती उद्भवणार नाही