नेवासा – भेंडे बुद्रूक (ता.नेवासा) येथील लोकनेते मारुतराव घुले – पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सन २०२१ – २०२२ च्या चालु गळीत हंगामातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसगाळपामधून प्रति टन १०९.६५ पैसे कपात केले होते. शेतकऱ्यांना ती रक्कम परत मिळणार आहे. साखर आयुक्तांनी याबाबतचे आदेश दिलेले आहेत.
दरम्यान, कारखाना व्यवस्थापनाने शेतकऱ्यांच्या कपात केलेल्या रक्कमेचे रुपांतर ठेवीमध्ये केले होते. मात्र या कारखाना व्यवस्थापनाच्या अयोग्य भूमिकेविरुद्ध भाजपाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या नेत्तृत्वाखाली दिवाळीच्या दिवशी नेवासा तहसिल कार्यालयासमोर चटणी भाकर खाऊन आंदोलन करण्यात आले होते.
यामुळे याप्रकरणी राज्याच्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी विशेष लक्ष घालून ज्या सभासदांना कारखान्याने कपात केलेली रक्कम मान्य नसेल त्यांनी पुन्हा कारखान्याकडे अर्ज करुन पैसे माघारी घेवू शकता, असा आदेशच साखर आयुक्तांनी दिला आहे. त्यामुळे मुरकुटेंच्या आंदोलनाला यश आल्यामुळे भारतीय जनता पार्टीच्यावतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला आहे. भाजप नेते अंकुश काळे, शिवसेनेच्या महीला तालुका प्रमुख मिरा गुंजाळ यांसह भाजप – सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला.