गुंजवणीचे पाणीही लवकर आणणार -आमदार संजय जगताप
सासवड – पुरंदर तालुक्याची जीवन संजीवनी ठरणारी व गेल्या अनेक वर्षांपासून बहुचर्चित असलेले गुंजवणीचे पाणी लवकरच पुरंदरमध्ये आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय विमानतळ पुरंदरमध्येच होणार, असा पुनरुच्चार आमदार संजय जगताप यांनी रविवारी (दि. 13) केला.
कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्या प्रमुख नेत्यांची रविवारी (दि. 13) बैठक पार पडली. या बैठकीमध्ये गुंजवणीच्या पाण्याचा आराखडा दाखविण्यात आला. यावेळी आमदार संजय जगताप यांनी पत्रकार परिषद घेऊन वरील माहिती दिली. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष माणिक झेंडे पाटील, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप पोमन, सुदामराव इंगळे, दिगंबर दुर्गाडे, नंदूकाका जगताप, दत्ता झुरुंगे, बाबुसाहेब माहूरकर आदी उपस्थित होते.
आमदार संजय जगताप म्हणाले, विमानतळ पुरंदरमध्ये होणार असून त्याच्या जागा बदलण्याबाबत व इतर तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन पुढील योग्य ते निर्णय घेण्यात येतील. यासंदर्भात आता काही बोलणे उचित ठरणार नसून सर्व अभ्यास करून लवकरच या संदर्भात तालुक्याला गुंजवणी व विमानतळ या दोन्ही गोष्टी आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.
गुंजवणीच्या संदर्भात सोमवारी (दि. 7) जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासमवेत खासदार सुप्रिया सुळे यांची बैठक पार पडली. दरम्यान, या संदर्भातील पुढील आढावा खासदार सुप्रिया सुळे व जलसंपदा मंत्री यांना देणार असल्याचे त्यांनी नमूद केले. पुरंदर तालुक्यामध्ये 25/15 या योजनेतून तालुक्यासाठी 6.5 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, यामध्ये रस्ते व समाज मंदिर यांचादेखील समावेश आहे. ही कामेदेखील तात्काळ सुरू होतील. गेल्यावर्षी नुकसानभरपाईचे पैसे काही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले नव्हते. त्यातील तिसऱ्या टप्प्यातील निधी देखील मंजूर झालेला आहे. याचे वितरणाचे काम सध्या सुरू आहे.
- संभाजीमहाराज यांचे जन्मस्थळ असणाऱ्या पुरंदर किल्ल्यावर गेल्यावर्षीच्या अतिवृष्टीमध्ये स्मारकाचे नुकसान झाले होते. त्याच्या दुरुस्तीसाठी देखील प्रयत्न करणार आहे. शासकीय जयंतीसाठी शासन निर्णय घेण्यासाठी सुद्धा प्रयत्न करू.
– संजय जगताप, आमदार