नगर -करोनामुळे सर्वांचेच अर्थकारण कोलमडले आहे. त्यामुळे नगरकरांना मालमत्ताकर भरण्यासाठी शास्तीमाफी द्यावी लागेल, अशी भूमिका सर्वपक्षीय नगरसेवकांनी मांडली. त्यास प्रशासनाने हिरवा कंदील दर्शविला असून, शास्तीमाफी संदर्भात लवकरच निर्णय घोषित केला जाईल, अशी ग्वाही आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी आज दिली.
महापालिका प्रशासनाने काल यावर्षीचे अंदाजपत्रक महासभेला सादर केले होते. त्यावर आज ऑनलाइन महासभा घेवून चर्चा करण्यात आली. महापौर बाबासाहेब वाकळे, उपमहापौर मालण ढोणे, आयुक्त श्रीकांत मायकलवार, प्रभारी सचिव एस. बी. तडवी यांच्यासह सदस्य या महासभेत सहभागी झाले होते.
महापालिकेचे मुख्य लेखाधिकारी प्रवीण मानकर यांनी अंदाजपत्रकातील तरतुदी वाचून दाखविल्या. त्यानंतर सुरू झालेल्या सविस्तर चर्चेत जमा बाजूवर सदस्यांनी भूमिका मांडली.
महापालिकेच्या मालमत्ताकर वसुलीचा प्रश्न गंभीर आहे. अंदाजपत्रकात गृहीत धरलेले हे उत्पन्न कधीच येत नसल्याबद्दल अनेकांनी भूमिका मांडली. त्यावर वसुलीची जबाबदारी उपायुक्तांवर निश्चित करत असल्याची घोषणा महापौर वाकळे यांनी अखेरीस केली.
वृक्षकराचा निधी फक्त वृक्ष संवर्धनाच्या कामासाठीच वापरण्यात यावा, या नगरसेवक योगिराज गाडे यांच्या सूचनेला सर्वांनी अनुमोदन दिले. नगरसेवक गणेश भोसले यांनी वृक्षकराच्या खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी समिती गठीत
करण्याची सूचना मांडली. बोल्हेगाव, नागापूर भागात पावसाचे पाणी शेतात साचत असल्याने ते आपत्ती विभागाकडून काढून घेण्याची मागणी राष्ट्रवादीचे नगरसेवक कुमार वाकळे यांनी केली.
पाणीपुरवठा विभागात अपुरे कर्मचारी असल्याची, बाळासाहेब देशपांडे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची व्यथाही नगरसेवकांनी मांडली. तेथे कर्मचारी वाढविण्याची मागणी केली. त्यावर महापौरांनी रक्तपेढीतील कर्मचारी बाळासाहेब देशपांडे रुग्णालयास देवून कर्मचारी संख्या वाढविण्याच्या सूचना दिल्या. आशा सेविकांच्या मानधनावरही यावेळी चर्चा झाली.
महापालिकेने बुरुडगावला रस्ता, पथदिवे व पाण्याची व्यवस्था करण्याचे मान्य केले होते. तथापि, आश्वासन पाळले नसल्याने बुरुडगावातील ग्रामस्थांनी महापालिकेला कचरा डेपो बंद करण्याची नोटीस दिलेली आहे. त्यावर तातडीने रस्ता व पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते संपत बारस्कर व गणेश भोसले यांनी केली. त्यासंदर्भातही महापौर वाकळे यांनी तातडीने काम करण्याच्या सूचना दिल्या.