नगर- अल्पवयीन मुलीचे फोटो स्टेटसला ठेवल्याने विनयभंगासह पोक्सोचा गुन्ह्यातील आरोपीने पोलिसांची नजर चुकवून बेडीसह पोलीस व्हॅनमधून पलायन केल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री सबजेल समोर घडली. त्यानंतर पोलिसांची चांगलीच धावपळ झाली. अखेर तासाभरात पोलिसांनी सिद्धार्थनगर परिसरात त्याला अटक केली.
तीक उर्फ सनी रमेश लिपाणे (रा. तपोवन रोड) असे या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर तोफखाना पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. 5) रात्री गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी त्याला अटक केली. त्याला व अन्य एका गुन्ह्यातील महिलेला लॉकअपमध्ये ठेवण्यासाठी स. फौ. दिलीप अकोलकर, पो. ना. हरिश्चंद्र माने, महिला होमगार्ड आडोळे, पो.कॉ. गौतम डुचे हे पोलिस व्हॅनमध्ये दोघा आरोपींना घेवून त्यांची जिल्हा शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली.यातील महिला आरोपी ही न्यायालयीन कोठडीत असल्याने तिला सबजेलमध्ये पोहोच करण्यासाठी मध्यरात्री 1 वाजता पोलिसाची व्हॅन सबजेल येथे गेली.
त्यावेळी आरोपी तीक लिपाणे याच्या हातात बेडी होती. स. फौ. अकोलकर यांनी लिपाणे याच्यावर लक्ष ठेवण्याच्या सूचना पो. ना. माने व पो.कॉ. डुचे यांना देवून महिला होमगार्ड आडोळे यांच्यासमवेत त्या महिला आरोपीला सबजेलमध्ये घेवून गेले.
तेथे महिला आरोपीना ठेवण्याची व्यवस्था नसल्याने सबजेलमधून त्यांना या महिलेला राहुरीच्या लॉकअपमध्ये ठेवण्याचे पत्र देण्यात आले. हे पत्र घेवून ते महिला आरोपीसह पोलीस व्हॅनकडे आले असता तेथे पो. ना. माने व पो.कॉ. डुचे यांच्या आजूबाजूला शोधशोध करत असल्याचे दिसले. त्यांना विचारणा केली असता आरोपी तीक लिपाणे हा आमची नजर चुकवून बेडीसह व्हॅनमधून पळून गेल्याचे त्यांनी सांगितले. अकोलकर यांनी ही माहिती तातडीने तोफखाना पोलिस ठाण्यात कळविली. तसेच रात्र गस्तीवर असलेले स. पो. नि. नितीन रणदिवे यांनाही माहिती देण्यात आली. तोफखाना पोलिसांची विविध पथके आरोपीच्या शोधात शहरात फिरत असताना तो सिध्दार्थनगर परिसरात मिळून आला. त्याला पोलिसांनी पकडले.