पिंपरी (प्रतिनिधी) – महापालिकेच्या पिंपरी – संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 81 वर्षीय ज्येष्ठासह 30 वर्षाच्या युवकाने करोनावर मात केली. त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला. डॉक्टरांनी घेतलेल्या अथक परिश्रमांमुळे रूग्णांना बरे करण्यात यश आले.
दोघेही पुण्यातील रहिवाशी आहेत. वायसीएम रुग्णालयातील अतिदक्षता विभागामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. दोन्ही रूग्णांची स्थिती खालावलेली असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल केले होते. तथापि, 14 दिवस उपचार केल्यानंतर त्यांच्या सलग दोन्ही करोना चाचण्या निगेटिव्ह आल्या. त्यानंतर आज त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. तसेच, 14 दिवस होम क्वॉरंटाईन होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
रुग्णालयाचे वैद्यकिय अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, मेडीसीन विभागाचे प्रमुख डॉ. प्रवीण सोनी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टरांच्या पथकाने रूग्णांवर उपचार केले. करोनामुक्त झाल्याबद्दल रुग्णांचे अभिनंदन करत त्यांना निरोप देण्यात आला. त्या प्रसंगी डॉ. वाबळे यांच्यासह डॉ. सोनी, किशोर खिल्लारे, अनिकेत लाठी, स्मिता पानसे, कौस्तुभ कहाने, अभयचंद्र दादेवार, अक्षय शेवाळे, वालिद आदी डॉक्टर तसेच, परिचारिका सुर्वे, संगीता पाटील आदी उपस्थित होते.