पिंपरी, दि. 16 (प्रतिनिधी) – सांगवी फाटा येथील जिल्हा रुग्णालयात आज 49 वर्षीय करोना बाधित पुरुषाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. पुणे-मंगळवार पेठ येथील ते रहिवाशी होत. त्यांच्यावर अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू होते. त्यांना तीनच दिवसांपूर्वी उपचारासाठी दाखल केले होते. त्या वेळी ते अत्यवस्थ होते.
लिव्हरचा (यकृत) जुना आजारही त्यांना होता. उपचार सुरू असताना त्यांचा आज मृत्यू झाला. रुग्णालयात आत्तापर्यंत एकूण 8 जणांचा करोनाने मृत्यू झाला आहे. दरम्यान, आज नव्याने दोघांना करोनाची लागण झाली. त्यामध्ये 74 वर्षीय ज्येष्ठ नागरिक आणि 52 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
ज्येष्ठ नागरिक पुण्यातील ढोले पाटील रस्ता तर, महिला रुग्ण मंगळवार पेठेतील रहिवाशी आहे. रुग्णालयात सध्या 11 करोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यातील चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. आत्तापर्यंत 23 रुग्णांना उपचार करून घरी सोडण्यात आलेले आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण येथील 14 संशयित रुग्णांना आज उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश रोकडे यांनी दिली.