वॉशिंग्टन – उत्तर कोरियाने त्यांचे प्रमुख किम जोंग यांच्या उपस्थितीत गुरूवारी दोन अल्पपल्ल्यांच्या क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली. हा अमेरिकेला थेट इशारा असल्याचा अन्वयार्थ माध्यमांनी लावला आहे. तथापी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तो धुडकाऊन लावला आहे. ते म्हणाले की हा आम्हाला नव्हे तर त्यांचे शेजारी दक्षिण कोरियाला इशारा होता.
दक्षिण कोरियाने अमेरिकेच्या बरोबरीने संयुक्त लष्करी कवायत आयोजित केली आहे. त्यावर त्यांचा राग आहे. त्यामुळे त्यांनी अमेरिकेला इशारा दिलेला नाही असे ट्रम्प यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले. माझे किम यांच्याशी अत्यंत चांगले संबंध आहेत. आम्ही आता एकत्र काम करायचे ठरवले आहे. त्यात आता काय प्रगती होते आहे हे पहावे लागेल असे ते म्हणाले. उत्तर कोरियापासून अमेरिकेला कोणताही धोका नसल्याचेही ट्रम्प यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले.