अहमदनगर – भाजप नेते आणि आमदार नितेश राणे नेहमीच आपल्या सडेतोड वक्तव्यांसाठी ओळखले जातात. शिवसेना असो की काँग्रेस राणे एखाद्यावर टीका करताना शब्दांची काटकसर आजिबात करत नाहीत यामुळे अनेकदा त्यांच्या विधानांची देखील जोरदार चर्चा होते. नुकतंच राणेंनी स्थानिक राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचयवर टीका करत ते माझ्या नजरेला नजर भिडवू शकत नाही असं म्हंटल होत. आता यावर संग्राम जगताप यांनी देखील राणेंना प्रत्युत्तर देत त्यांची उंची माझ्या शर्टच्या पहिल्या बटनपर्यंत येईल असा टोला लगावला आहे.
“नगर शहरात स्वाभिमान नसलेला एक आमदार आला होता. स्थानिक आमदार माझ्या नजरेला नजर भिडवू शकत नाही असं त्यांनी म्हंटल. निश्चितच उंचीचा प्रॉब्लेम असल्यामुळे नजरेला नजर भिडतच नाही. माझ्या शर्टाच्या पहिल्या बटनपर्यंत त्या आमदाराची उंची आहे” अशा कडक शब्दात आमदार संग्राम जगताप यांनी नितेश राणेंवर जोरदार हल्लाबोल केला.पत्रकार परिषद घेत जगताप यांनी राणेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिल.
“त्यांना नजरेला नजर मिळवायची असेल तर त्यांनी सांगावं आम्ही नक्की येऊ. नगर शहरात येऊन अशी भाषा वापरू नये.. जशास तसे उत्तर देण्यास आम्ही तयार आहोत ” असा इशारा देखील जगताप यांनी यावेळी राणेंना दिला.
नेमकं काय म्हणाले होते नितेश राणे
नितेश राणे हे नगरमध्ये आले असता त्यांनी नाव न घेता संग्राम जगताप यांच्यावर टीका केली होती. “स्थानिक आमदार तुम्हाला वाचवायला येणार काय? माझ्या नजरेला उभा राहत नाही तो. उगाच माझ्या वाटेला येऊ नका. पुढच्यावर्षी 2024 आहे. जो कार्यक्रम आहे तो एकदाच करू. मी स्वतः प्रचाराला येणार आणि एकदाच या लोकांना हिंदुंची ताकद दाखवणार” असं राणे यावेळी म्हणाले होते.