आमदार दिलीप मोहिते : राजगुरूनगरातील खासगी डॉक्टरांना आवश्यक मदत करणार
राजगुरूनगर- शहरातील खासगी डॉक्टरांना आवश्यक ती मदत केली जाईल. तसेच ज्यांच्याकडे अद्ययावत लॅब आहे त्याठिकाणी करोना विषाणूंची तपासणी करण्यासाठी परवानगी देण्यात येईल, असे आश्वासन आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी दिले.
करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शहरातील खासगी डॉक्टरांची आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीला पोलीस उपाधीक्षक गजानन टोम्पे, डॉ. सुभाष खडके, डॉ. शिवाजी गायकवाड, डॉ. शेखर घुमटकर, डॉ. प्रदीप शेवाळे, डॉ. प्रमिला बांबळे, डॉ. अभिजित चिखलीकर, डॉ. विजय आंबरे, डॉ. विशाल डोळस, डॉ. योगेश तुपे यांच्यासह जिल्हा बॅंकेचे विभागीय अधिकारी विलास भास्कर उपस्थित होते.
करोना विषाणू आजाराचे जगभरासह राज्यात रुग्णाच्या संख्येत वाढ होत आहे. या विषाणूंचा फैलाव होत असताना अनेक खासगी डॉक्टर स्थानिक नागरिकांना विविध आरोग्य सेवा देत आहेत. मात्र, काही समाजकंटक खासगी डॉक्टरांच्या बाबतीत अफवा पसरवत आहेत. करोना विषाणू प्रसार होत असल्याने लॉकडाऊनच्या काळात खासगी डॉक्टरांना आवश्यक त्या सुविधा मिळाव्यात व सोशल मीडियावर चालली बदनामी थांबिवण्यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी खासगी डॉक्टरांनी आमदार मोहिते यांच्याकडे केली.
आमदार मोहिते म्हणाले की, करोना आजारावर प्रभावी नियंत्रण राखण्यासाठी चाकण एमआयडीसी मधील मोठ्या कंपन्यांनी मदत करण्याचे मान्य केले आहे. खासगी डॉक्टरांनी रुग्णांना सेवा द्यावी. नागरिकांना मेडिकलच्या सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत. नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे. लॉकडाऊनच्या काळात गरज असेल त्यांनीच दवाखान्यात जावे.
- सोशल मीडियावरून अफवा अथवा जाणून बुजून एकादी पोस्ट करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला जाईल. करोना विषाणूबात जनजागृती होणे आणि घरी थांबणे हाच एकमेव पर्याय आहे. या काळात डॉक्टरांची भूमिका महत्वाची आहे. डॉक्टारांबाबत अफवा पसरावणाऱ्यांची गय केली जाणार नाही.
– गजानन टोम्पे, पोलीस उपअधीक्षक