पुणे : समाज माध्यमांतून कोरोना संदर्भात पसरणाऱ्या अफवा रोखण्यासाठी वर्तमानपत्र ही अत्यंत आवश्यक बाब आहे. वर्तमानपत्रांमुळे कोरोनाचा प्रसार होत नाही. त्यामुळे वर्तमानपत्रांना आवश्यक ते सर्व सहकार्य देण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी शनिवारी दिले.
वर्तमानपत्रांच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची भेट घेतली. यावेळी सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात वर्तमानपत्र आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना भेडसावणाऱ्या प्रश्नाकडे त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. पुण्यात छापलेली काही वर्तमानपत्रे नगर, कोल्हापूरपर्यंत जातात. आंतर जिल्हाबंदीमुळे तेथे त्यांचे वितरण करणे अवघड जात आहे. तसेच पेट्रोल आणि डिझेल मिळणे आवश्यक आहे, याकडे त्यांचे लक्ष वेधले. त्याचबरोबर छपाई यंत्रावर काम करणारे आणि आर्टीस्ट, पेजिनेटर यांचीही गरज संपादकीय विभागाएवढीच आवश्यक असते. त्यांना येण्याची परवानगी मिळावी. ज्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्याची गरज नाही, अशा व्यक्तींना आम्ही वर्क फ्रॉम होम करण्यास सांगत आहोत, असे वर्तमानपत्रांच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांना आश्वस्त केले.
वर्तमानपत्रांच्या प्रतिनिधींनी केलेल्या प्रांजळ निवेदनाला जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. जिल्हाबंदीचा फटका वर्तमानपत्रांच्या वाहतुकीला बसू नये. तसेच वर्तमानपत्रांच्या वाहतुकीसाठी पेट्रोल आणि डिझेल यांची कमतरता भासू नये. वर्तमानपत्र विक्रते त्यांच्याकडील लाईन बॉय यांच्याकडे ओळखपत्रे असतील, त्यांना पोलिसांनी अडवू नयेत यासाठी आम्ही परिपत्रक काढत आहोत, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
काही ठिकाणी वृतपत्रविक्रेत्यांना सोसायटीमध्ये अडवण्यात आले. त्यामुळे वर्तमानपत्रे बंद करावी लागली. वर्तमानपत्र बंद करावीत ही वर्तमानपत्रांच्या व्यवस्थापनाची कधीही मानसिकता नव्हती. मात्र विक्रते आणि स्टॉलधारक यांना भेडसावलेल्या अडचणींमुळे वर्तमानपत्रे बंद करावी लागली, असे वर्तमानपत्रांच्या प्रतिनिधींनी स्पष्ट केले.
कोरोनाच्या लढाईत वर्तमानपत्र महत्वाची भूमिका बजावू शकतात, ही सरकारची पहिल्यापासून धारणा आहे. त्यामुळे वर्तमानपत्रे बंद झाल्यामुळे त्यापासून कोरोनाची शक्यता आहे, या अफवेला चालना मिळाली. त्यामुळे तातडीने वर्तमानपत्रे सुरू व्हायला हवीत. कारण समाजमाध्यामांमध्ये अफवांचे पीक पसरत आहे. त्याला उत्तर देण्यासाठी अधिकृत माहिती देणाऱ्या आणि जनसामान्यांचा विश्वास असणाऱ्या वर्तमानपत्रासारख्या माध्यामाची अधिक गरज आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
———————————-
जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
वर्तमान पत्रांमुळे कोरोना पसरत नाही. याउलट आपण वर्तमानपत्र वाचल्याने आपल्याला दर्जेदार आणि विश्वासार्ह माहिती वाचायला मिळू शकते. वाचनाने कोणालाही कोरोना होत नाही. आपण घरात राहणे, नेहमी हात धुणे, चेहऱ्याला हात न लावणे या साध्या गोष्टी सांभाळल्या तरीही आपण कोरोनापासून स्वत:ला वाचवू शकतो. तेंव्हा घरात रहा आणि वर्तमानपत्रातून अद्यायवात अधिकृत माहिती मिळवा.
नवल किशोर राम
जिल्हाधिकारी, पुणे
—————————————
महापालिका आयुक्तांचे आवाहन
वर्तमानपत्राद्वारे कोरोना पसरत नाही, हे तज्ज्ञांनी जाहीर केले आहे. पुणेकरांना अचूक आणि घरबसल्या दर्जेदार मिळण्यासाठी वर्तमानपत्र हे विश्वासार्ह साधन आहे. त्यामुळे कोणताही संकोच अथवा शंका न बाळगता उद्यापासून नि:संकोच वर्तमान पत्र घ्या.
शेखर गायकवाड
आयुक्त, पुणे महापालिका