मुंबई/पुणे – शिक्षक पात्रता परीक्षेच्या (टीईटी) गैरव्यवहारात उपसचिव दर्जाच्या अधिकाऱ्याला अटक केल्यामुळे भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) आणि भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) अधिकाऱ्यांमध्ये वाद रंगण्याची शक्यता आहे. पोलिसांच्या ताब्यातील आयएएस अधिकारी सुशील खोडवेकर (43) याला जामीन न मिळाल्यास तो सेवेतून निलंबित होऊ शकतो. तसे झाल्यास पोलिसांवर त्याचा अधिकारी असण्याचा दबाव संपुष्टात येऊ शकतो. त्यामुळे त्याच्याकडून या गैरव्यवहारात सहभागी असणाऱ्या आणखी काही बड्या माशांची नावे चैकशीत उघड होऊ शकतात. त्यामुळे त्याला वाचवण्यासाठी आयएएस लॉबी कार्यरत झाली आहे. मात्र, या लॉबीच्या दबावाला न जुमानता तपास पुढे सुरू ठेवण्याचा निर्धार पोलिसांनी केला आहे, अशी चर्चा मंत्रालय आणि पोलीस दलात रंगली आहे.
खोडवेकर याने जी. ए. सॉफ्टवेअरला क्लिन चिट देण्यासाठी दबावतंत्राचा वापर केला, असा त्याच्यावर आरोप आहे. मात्र, यात खोडवेकर याचा थेट संबंध खूप कमी असण्याची शक्यता असून कोणाच्या तरी सांगण्यावरून त्याने हे काम केले असावे, त्याचे नाव बाहेर येऊ नये यासाठी आता सचिव पातळीवरून आणि त्यांच्या ओळखीतून मंत्रिमंडळातून दबाव आणण्याचे प्रयत्न सुरू झाले असल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली. प्रत्यक्षात मात्र राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलिसांना या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी “फ्री हॅण्ड’ दिला आहे. त्यामुळे आयएएस लॉबीच्या प्रयत्नांना मर्यादा येत आहेत, अशी माहितीही या सूत्रांनी सांगितली.
यापूर्वी गैरव्यवहार प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींकडे केलेल्या चौकशीत खोडवेकर याचा सहभाग असल्याचे आढळल्याने सायबर पोलिसांनी त्याला अटक केली. खोडवेकर हा 2011 च्या बॅचचा आयएएस अधिकारी आहे. न्यायालयाने त्याला 31 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. शिक्षक पात्रता परीक्षा 2019-20 मधील गैरव्यवहार प्रकरणात 30 ते 35 आरोपींना अटक करण्यात आली आहे. शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी-2020) गैरव्यवहार प्रकरणाच्या तपासात सात हजार 880 अपात्र उमेदवारांना गैरमार्गाने पात्र ठरविण्यात आले असून त्यांच्याकडून प्रत्येकी एक लाख ते अडीच लाख रुपये घेण्यात आले असून, त्यांना प्रमाणपत्र देण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
तपासादरम्यान खोडवेकर हे यापूर्वी अटक करण्यात आलेल्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी सुपे, सावरीकर, देशमुख व मनोज डोंगरे याच्या संपर्कात असल्याचे उघडकीस आले आहे. देशमुख व सुपे यांनी डोंगरे याच्यामार्फत खोडवेकर यांना लाखो रुपये दिल्याचे चौकशीदरम्यान सांगितले. परीक्षा आयोजनामध्ये अक्षम्य चुका केल्यामुळे शिक्षण विभागाने काळ्या यादीत टाकलेल्या जी. ए. सॉफ्टवेअर कंपनीला काळ्या यादीतून बाहेर काढण्यासाठी खोडवेकर याने सुपे याला सूचना केल्याची माहिती तपासात समोर येत आहे.
भरती घोटाळ्यातही खोडवेकर
बंडगार्डन पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या शिक्षक भरती घोटाळ्याशी खोडवेकरचा संबंध असल्याची चर्चा सुरू आहे. शिक्षक भरती घोटाळा प्रकरणाचा तपास झाल्यावर पुणे पोलिसांनी शिक्षण विभागातील दोषी अधिकाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करावी अशी मागणी करणारे पत्र खोडवेकरला दिले होते. मात्र, त्याने त्याला कचऱ्याची पेटी दाखवली होती. पोलिसांना शिक्षक भरती घोटाळ्यासंबंधी तपास करण्याचा कोणताच अधिकार नाही अशी भूमिका घेत त्याने पोलिसांना सहकार्य करणे टाळले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.