मुंबई : टीईटी परीक्षा पेपरफुटी प्रकरणात पुन्हा एकदा धक्कादायक माहिती समोर आली आहे. शिक्षक पात्रता परीक्षेतील घोटाळा प्रकरणी महाराष्ट्र परीक्षा मंडळाचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांच्या घरातून पहिल्या धाडीत 88 लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केल्यानंतर आता दुसऱ्या धाडीत दोन कोटींहून अधिक रक्कम जप्त केली असल्याची धक्कादायक माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांना तपासात सुपेंच्या घरातून दोन कोटीहून अधिक रक्कम आणि सोने जप्त केले आहे. सुपे यांच्या घरी पोलीस धाड टाकायच्या आधीच पत्नी आणि मेहुण्याने रक्कम दुसरीकडे ठेवली होती. मात्र पोलिसांनी कसून तपास केल्यानंतर दोन कोटींहून अधिक रक्कम आणि सोने त्यांना मिळाले.
याआधी 17 डिसेंबर रोजी शिक्षक पात्रता परीक्षेत महाराष्ट्र परीक्षा मंडळाचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांच्या घरातून 88 लाख रुपयांची रोख रक्कम पुणे पोलिसांनी जप्त केली होती. पुणे पोलिसांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचा अतिरीक्त कार्यभार असलेले तुकाराम सुपे यांना पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. सुपेंसोबत शिक्षण आयुक्ताचा सल्लागार अभिषेक सावरीकर यालाही पोलिसांनी अटक केली आहे.
म्हाडा पेपरफुटीप्रकरणी सुरू असलेल्या तपासात अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत असून इतर परीक्षांमधील घोटाळे बाहेर येत आहेत. शिक्षक पात्रता परीक्षेतही पैसे घेऊन अनेकांना उत्तीर्ण करण्यात आल्याचे समोर आले आहे.