पुणे- शिक्षक पात्रता परीक्षा गैरव्यवहार प्रकरणातील (टीईटी) अपात्र उमेदवारांनी साक्षीदार होऊन तपासासाठी सहकार्य करावे, असे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात आले आहे. दलालांमार्फत पैसे देऊन पात्र झालेले अपात्र उमेदवार साक्षीदार न झाल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
टीईटीच्या दोन्ही परिक्षांमध्ये 9,300 अपात्र उमेदवारांनी गैरमार्गाचा अवलंब केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. दलालांमार्फत उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना पैसे पोहचविण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. अपात्र उमेदवारांची यादी सायबर पोलिसांनी शिक्षण विभागाकडे सादर केली असून शिक्षण विभागाने यादीची पडताळणी केली आहे. टीईटी गैरव्यवहार प्रकरणात पोलिसांनी साडेतीन लाख प्रश्नपत्रिकांची पडताळणी केली आहे. ओएमआर शीटमध्ये काही ठरवून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यात आलेली नाहीत. पात्र उमेदवारांच्या यादीत अपात्र उमेदवारांचे नावे समाविष्ट करण्यात आलेली असल्याचे उघडकीस आले आहे.
पाळेमुळे बिहारमध्ये
ऑनलाइन प्रश्नपत्रिका फुटीची पाळेमुळे बिहारमधील पाटण्यात असल्याची माहिती तपासात उघडकीस आली आहे. अटकेतील एका आरोपीने ही माहिती दिली आहे. ऑनलाइन प्रश्नपत्रिका फूट प्रकरणात देशभरातील दलालांची साखळी गुंतल्याचे उघडकीस आले आहे. परीक्षा घेणाऱ्या खासगी कंपन्या काही तास प्रश्नपत्रिका सर्व्हरवर डाऊनलोड करतात. गैरप्रकार करणारे सर्व्हरच्या गोपनीय क्रमांकात (प्रोगामिंग कोड) छेडछाड करून प्रश्नपत्रिका फोडतात. परीक्षा केंद्रावरील संगणकात छेडछाड करून गैरप्रकार केले जातात. परीक्षा घेणारी कंपनी तसेच परीक्षा केंद्रातील काहीजणांशी संगमनत करून ठराविक क्रमांकाच्या उत्तरपत्रिकेतील उत्तरे थेट ऑनलाइन बदलली जातात.