कराड शहरात वाढतेय मोकाट कुत्र्यांची दहशत

बारा डबरी परिसरातील सात नागरिकांना चावा; पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

कराड – गेल्या काही महिन्यांपासून कराड शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली आहे. ही मोकाट कुत्री नागरिकांच्या अंगावर धाऊन जात असल्याने त्यांची दहशत दिवसेंदिवस वाढू लागली आहे. येथील बारा डबरी परिसरातील सात नागरिकांना या मोकाट कुत्र्यांनी चावा घेतला असल्याची घटना गुरूवारी घडली. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांवर येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान स्वच्छ सर्वेक्षणच्या कामात व्यस्त असलेल्या पालिका प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

दरम्यान, या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर शिक्षक कॉलनी, रेव्हीन्यू कॉलनी, मुजावर कॉलनी, बारा डबरी परिसर व सूर्यवंशी मळा येथील रहिवाशांनी एकत्रित येत उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील यांची भेट घेऊन मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली. यावेळी आरोग्य सभापती महेश कांबळे उपस्थित होते. यावर जयवंतराव पाटील यांनी कुत्र्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त केला जाईल, अशी ग्वाही दिली.

शहरात गेल्या काही महिन्यांपासून मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला आहे. सायंकाळी जाणाऱ्या वाहनांच्या पाठीमागे लागणे, लहान मुलांना चावा घेणे असे प्रकार अनेक ठिकाणी घडले आहेत. मात्र पालिका प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. अनेकवेळा नागरिकांनी मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती. मात्र पालिकेकडून कोणतीही व्यवस्था करण्यात आली नाही. त्यामुळे मोकाट कुत्र्यांची दहशत दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.

गुरूवारी रात्री 8 ते 8.30 वाजण्याच्या सुमारास बारा डबरी परिसरातील एकूण सात जणांना या मोकाट कुत्र्यांनी चावा घेतल्याने ते गंभीर जखमी झाले. यामध्ये महिला व लहान मुलांचाही समावेश आहे. काही नागरिकांनी जखमींना तात्काळ वेणूताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. ही वार्ता कळताच शहरातील अनेक नागरिकांनी उपजिल्हा रूग्णालयात धाव घेतली.

यावेळी नागरिकांनी येथे सतत मोकाट कुत्र्यांचा त्रास होत असल्याचे सांगितले. या प्रकाराने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले असून मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. या प्रकरणाची नगरपालिकेने गंभीर दखल घ्यावी या हेतूने त्रिशंकू भागातील नागरिकांनी कुत्र्यांच्या बंदोबस्त करण्याच्या मागणीचे निवेदन उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील यांना दिले. पालिकेने मोकाट कुत्र्यांना पकडून नागरिकांना भयमुक्‍त करावे, अशी मागणी नागरिकांनी केली.

अशी आहेत जखमी झालेल्यांची नावे…
मोकाट कुत्र्यांनी बारा डबरी परिसरातील सात जणांचा चावा घेतला. उत्तरेश्‍वर गोरोबा वाघमारे, वंदना कृष्णा लोंढे, अनिल लागाप्पा खट्टीमणी, उमेश कोळी, ज्योत्स्ना जहागिरदार, जमीर मुल्ला, महेश कोळी अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. त्यांच्यावर वेणूताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.