न्यूयॉर्क: कोरोनामुळे अमेरिकेत भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. अमेरिकेची आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडून गेली आहे. या कोरोनाला रोखायचे कसे ? हाच अमेरिकेच्या आरोग्य यंत्रणेसमोरचा सध्याच्या घडीचा यक्ष प्रश्न आहे. अमेरिकेत असलेल्या भारतीयांनाही या कोरोनाचा फटका बसला आहे.
कोरोनामुळे अमेरिकेत आतापर्यंत ११ भारतीयांचा मृत्यू झाला असून १६ भारतीयांचे कोरोना चाचणीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोनामुळे अमेरिकेत आतापर्यंत १४ हजार पेक्षा जास्त नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. चार लाखापेक्षा जास्त नागरिकांना या व्हायरसची बाधा झाली आहे.
कोरोनाची लागण होऊन अमेरिकेत ज्या भारतीयांचा मृत्यू झाला आहे, ते सर्व पुरुष आहेत. मृतांमध्ये न्यूयॉर्कमधील १० आणि न्यूजर्सीमध्ये राहणाऱ्या एका भारतीयाचा समावेश आहे. ११ मृतांमध्ये न्यूयॉर्कमधील चार टॅक्सीचालक आहेत. न्यूयॉर्कमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. या शहरात कोरोनामुळे ६ हजारपेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे आणि १ लाख ३८ हजार जणांना कोरोनाची लागण झाली आहे.