पुणे – शहरातील नागरिकांपुढे ओला कचरा घरच्या घरी कसा जिरवावा ही मोठी समस्या आहे. ही समस्या सोडवण्यासाठी ओल्या कचऱ्याचे कंपोस्ट खत करून बंगला तसेच सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांच्या टेरेसवर अपार्टमेंटच्या छतावर बाग तयार करणे सहज शक्य आहे. त्यामुळे असा प्रयोग होऊ शकतो हे दाखवण्यासाठी एक पथदर्शी प्रकल्प महापालिकेने शिवाजीनगर घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या छतावर उभारला आहे.
या प्रकल्पाचे उद्घाटन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त शांतनु गोयल यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सह आयुक्त ज्ञानेश्वर मोळक, उपायुक्त माधव जगताप, नितीन उदास, संदीप कदम, डॉ. केतकी घाडगे, विभागीय आरोग्य निरीक्षक आय. एस. इनामदार, सहवर्धन सजग नागरिक समूहाचे दीप्ती थोरात, प्राजक्ता पटवर्धन आदी उपस्थित होते.
शहरातील कचरा समस्यांचे निर्मूलन करण्यासाठी महापालिका प्रशासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करण्यात येत आहेत. शहरातील विविध संस्था, या क्षेत्रात कार्यरत असणारे स्वयंसेवी संस्था, मंडळे, नागरिक मोठ्या प्रमाणावर पुढे येत आहेत.
ही बाग महापालिका आणि सहवर्धन समूहाचे सदस्य यांनी अतिशय मेहनतीने विकसित केली आहे. येथील विविध प्रकारची रोपे, फळे, फुले, भाजीपाला आणि मधमाशा पालन विकसना बाबत घेण्यात आलेली मेहनत तसेच करण्यात आलेले नियोजन कौतुकास्पद असून अशा प्रकल्पांमुळे घराबरोबरच शहरातील ओला कचरा निमूर्लन करण्यात मोठी मदत होणार आहे, असे गोयल म्हणाले.
या पथदर्शी प्रकल्पाच्या यशस्वितेमुळे शहराच्या विविध भागात असणाऱ्या मनपाच्या इमारतींवरील छतांवर (टेरेसवर) या प्रकारच्या छतावरील बागा विकसित करण्यात येतील आणि ओल्या कचऱ्याच्या समस्यांचे निर्मूलन अशा पद्धतीने केले जाईल, असे गोयल यांनी नमूद केले.