प्रकाश मेहता समर्थकांकडून पराग शहांच्या गाडीवर दगडफेक
मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि त्यातच आता भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. घाटकोपरमध्ये प्रकाश मेहतांच्या समर्थकांनी आज राडा घातला. मेहता यांच्या समर्थकांनी पराग शहा यांच्याविरोधात घोषणाबाजी केल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रकाश मेहतांऐवजी पराग शहांनां तिकीट दिल्यामुळे नाराज मेहता समर्थकांनी पराग शहांच्या गाडीवर हल्ला करत गाडीचे मोठे नुकसान केले असल्याचे सांगण्यात येत आहे.
भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी चौथी यादी शुक्रवारी सकाळी जाहीर केली आहे. या यादीतून प्रकाश मेहतांसारख्या भाजपच्या अनुभवी आणि ज्येष्ठ नेत्याला वगळण्यात आले. प्रकाश मेहतांऐवजी घाटकोपर पूर्व मतदारसंघातून पराग शहा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे नाराज झालेल्या प्रकाश मेहतांच्या समर्थकांनी पराग शहा यांच्या गाडीचा रस्ता उडवला. शहा यांच्याविरोधात घोषणा देत नाराज कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीची तोडफोड केली.
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पराग शहा हे प्रकाश मेहता यांच्या भेटीसाठी मेहता यांच्या घरी येत होते. मात्र, मेहता यांच्या संतप्त समर्थकांनी शहांची गाडी रस्त्यातच अडवली. मेहतांच्या समर्थकांनी घरासमोरच शहाविरोधात घोषणाबाजी केली.