मुंबई – ‘तेरे नाम’ चित्रपटाची अभिनेत्री भूमिका चावला ‘ऑपरेशन रोमियो’मधून पुन्हा एकदा पुनरागमन करणार आहे. अलिकडेच एका मुलाखतीद्वारे अभिनेत्रीने बॉलिवूड पासून दुर जाणापर्यंत ते सलमान खानसोबतच्या तिच्या कनेक्शनबद्दल खुलासे केले आहेत. शिवाय बॉलिवूडपासून दूर असल्याबद्दल खेद व्यक्त केला आहे. यावेळी भूमिकाने एका प्रश्नाला उत्तर देताना अभिनेता रणबीर कपूरचे नावही घेतले.
भूमिकाने 2003 मध्ये सलमान खानसोबत ‘तेरे नाम’ या चित्रपटातून पदार्पण केले होते. अभिनेत्रीला विचारण्यात आले की, तू तुझ्या करिअरबाबत कधी मागे वळून पाहताना पश्चात्ताप होतो का? यावर भूमिका म्हणाली, ‘कधीकधी मला वाटतं की कदाचित मी जास्त पीआर केलं असतं, तर नाव झालं असतं किंवा लूपमध्ये असते, पण मला असंही वाटतं की मी नाराज किंवा दु:खी होण्याइतकाही मला पश्चात्ताप झाला नाही. मला वाटते ती माझी शैली आहे की ते काहीही असले तरी सर्व काही चांगले आहे, जे झाले तेही चांगलेच झाले. कारण मी साऊथच्या चित्रपटांमध्ये खूप चांगले काम केले आहे आणि चांगल्या लोकांसोबत काम केले आहे. मी तेलुगू, तामिळ, कन्नड, मल्याळम या सर्वच भाषांमध्ये काम केले आहे. त्यामुळे मला तितकेसे काही वाटत नाही कारण मी तिथेही खूप काम केले आहे.
सलमान खानसोबत काही बोलणे होते का? असा प्रश्न अभिनेत्रीला केला असता तिने मान हलवली आणि उत्तर दिले नाही. भूमिकाला आणखी एक प्रश्न विचारण्यात आला, की तिला बॉलिवूडमधील कोणत्या अभिनेत्याबरोबर पडद्यावर रोमान्स करण्याची इच्छा आहे? यावर भूमिका म्हणाली रणबीरचा जेव्हा मी रॉकस्टार पाहिला तेव्हा मला असे वाटले की पडद्यावर त्याच्याबरोबर रोमान्स करावा.