लंडन – जर्मनीचा तीन वेळा ग्रॅंडस्लॅम स्पर्धा विजेता माजी टेनिसपटू बोरिस बेकर याला येथिल न्यायालयाने अडीच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. त्याच्यावर असलेल्या प्रचंड रकमेच्या कर्जाची परतफेड वेळेत न केल्याने तसेच स्वतःला दीवाळखोर घोषित केल्याप्रकरणी न्यायालयाने ही शिक्षा सुनावली असून त्याला कोणत्याही क्षणी अटक होण्याचेही संकेत मिळत आहेत.
बेकर याला लंडनमधील न्यायालयाने दिवाळखोर घोषित केले असून 2015 सालापासून त्याच्यावर असलेले कर्ज फेडण्यात आलेल्या अपयशामुळे न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.
या बाबत बेकरच्या वकिलांनी न्यायालयाला हे कर्ज फेडण्यासाटी बेकरला एक संधी व काही कालावधी देण्याची केलेली विनंतीही फेटाळण्यात आली आहे. बेकर हे कर्ज फेडू शकेल असा विश्वास नसल्याने हा निर्णय स्घित करणे शक्य नसून त्याला सुनावलेल्या शिक्षेत कोणतीही सवलत दिली जाणार नसल्याचेही आपल्या निकालात न्यायालयाने सांगितले आहे.
अर्बुटनॉट लॅथम अँड कंपनीने बेकरविरुद्ध न्यायालयात तक्रार दाखल केली होती. वेळेत व दिलेल्या मुदतीत बेकरने कर्जाची परतफेड केली नसल्याने त्याला दिवाळखोर घोषित करण्याची मागणी या कंपनीने केली होती. त्यावर बेकरची मलोर्का येथे असलेली मालमत्ता गहाण ठेवून 67 लाख डॉलर इतकी रक्कम उपलब्ध होऊ शकते. त्याला दिवाळखोर घोषित केल्यास त्याची प्रतिमा मलिन होणार आहे, असा युक्तीवाद त्याच्या वकिलांनी केला होता. त्यावर एका जागतिक स्तरावरच्या खेळाडूने या सगळ्या गोष्टींचा विचार आधी करायवा हवा होता, असे आपल्या निकालात न्यायालयाने म्हटले आहे. जागतिक क्रीडाक्षेत्रात इतका प्रख्यात खेळाडूबाबत तुरुंगवासाचा निकाल मिळणे पहिल्यांदाच घडले आहे.