पुणे – लग्नाचे अमिष दाखवून पळवून नेऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याला 10 वर्षे सक्तमजुरी आणि 15 हजार रुपये दंडाची शिक्षा विशेष न्यायाधीश एम.एम.देशपांडे यांनी सुनावली आहे. दंडाची सर्व रक्कम पीडितेला देण्यात यावी, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.
गणेश भागवत कांबळे (वय 19) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. याबाबत पीडितेच्या वडिलांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे सहायक जिल्हा सरकारी वकील पुष्कर सप्रे यांनी काम पाहिले. त्यांनी आठ साक्षीदार तपासले. त्यामध्ये पीडित, तिच्या वडिलांची साक्ष आणि डीएनए चाचणीचा पुरावा महत्त्वाचा ठरला. सिंहगड रोड पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक बी.बी.पिंगळे यांनी या प्रकरणाचा तपास केला. त्यांना पोलीस कॉन्स्टेबल डी.एम.महानवर यांनी न्यायालयीन कामकाजासाठी मदत केली. डिसेंबर 2014 ते ऑगस्ट 2015 या कालावधीत हिंगणे खुर्द, धायरी आणि नऱ्हे येथे हा प्रकार घडला. कांबळे याने लग्नाचे अमिष दाखवून पीडितेला पळवून नेले होते. त्यापूर्वी तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते. त्यातून ती गर्भवती राहिली होती. त्यावेळी तिचा गर्भपात करण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणाचा तपास करून सिंहगडरोड पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. त्यावेळी हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. डीएनए चाचणी सकारात्मक आलेली असून, सबळ पुरावा असल्याने त्याला अधिकाधिक शिक्षा देण्याची मागणी ऍड. पुष्कर सप्रे यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने भारतीय दंड संहिता कलम 376 (बलात्कार) नुसार 10 वर्षे सक्तमजुरी 10 हजार रुपये दंड, भादवी कलम 363 (पळवून नेणे) नुसार 3 वर्षे सक्तमजुरी आणि 2 हजार रुपये दंड, भादवी कलम 366 (अ) (जबरदस्तीने पळवून नेणे) नुसार 5 वर्षे सक्तमजुरी आणि 3 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सर्व शिक्षा एकत्रित भोगायच्या आहेत. दंड न भरल्यास अतिरिक्त सहा महिने कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे