इंदापूर – इंदापूर शरातील सरस्वती नगर येथील आर्यन मच्छिंद्र नाथजोगी (वय 10) या चिमुकल्याचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला आहे. सोमवारी (दि. 20) सायंकाळी सहाच्या दरम्यान घडली. मंगळवारी (दि. 21) सकाळी आठच्या सुमारास चिमुकल्याचे मृत शरीर शेततळ्यातून काढण्यात आले. या घटनेमुळे संपूर्ण इंदापूर शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
आर्यन हा दोन मित्रांसोबत खेळायला गेला होता. खेळ संपल्यानंतर तालुका क्रीडा संकुलाच्या इनडोअर टेनिस कोर्टच्या पाठीमागील शेततळ्यात पाय धुण्यासाठी गेला होता. त्यावेळी पाय घसरून तो शेततळ्यात पडला. सोबत असणारे दोन लहान मित्रांनी घराकडे पळ काढला व या घटनेबद्दल कोठेही वाच्यता केली नाही. संबंधित मुलाच्या आई-वडिलांनी इंदापूर पोलीस स्टेशन येथे मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार सोमवारी दिली. त्यानंतर मंगळवारी सकाळी आर्यन सोबत खेळायला गेलेल्या दोन मुलांनी सदरची घटना सांगितल्याने आर्यनचा मृतदेह सापडला.
मुलाचे आई-वडील मजुरी करून आपले कुटुंब चालवतात. अत्यंत हलाखीत जीवन जगत असताना अचानक एक मुलगा पाण्यामध्ये बुडवून मृत्यू पावल्याने या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. या कुटुंबियांना धीर देण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे इंदापूर शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे व त्यांच्या अन्य सहकारी मदत करीत आहेत.
फोटो- आर्यन जोगी