नवी दिल्ली – डिझेलच्या वापरामुळे होणारे प्रदुषण रोखण्यासाठी डिझेलची वाहने आणि जनरेटर सेट्सवर प्रदुषण कर म्हणून दहा टक्के अतिरीक्त जीएसटी कर वसुल करावा अशी सूचना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. येथील 63 व्या वार्षिक सियाम अधिवेशनात बोलताना गडकरी म्हणाले की, प्रदूषणाची वाढती पातळी नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे त्यावर अशा स्वरूपाच्या उपाययोजना आता कराव्या लागतील.
डिझेलवर चालणाऱ्या वाहनांवर अतिरिक्त 10 टक्के जीएसटी लावावा, असे पत्र मी अर्थमंत्र्यांना सुपूर्द करणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. देशातील बहुतांश व्यावसायिक वाहने सध्या डिझेलवर चालतात. प्रवासी वाहन उत्पादकांपैकी मारुती सुझुकी इंडिया आणि होंडा यासह विविध कार निर्मात्यांनी आधीच डिझेल कारचे उत्पादन बंद केले आहे.
गडकरी म्हणाले की, देशात डिझेल कारचा वापर मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे आणि उत्पादकांनीही त्यांची बाजारातील विक्री थांबवण्याची गरज आहे. डिझेल हे घातक इंधन असल्याचे सांगून, गडकरी म्हणाले की त्याची आयात विदेशातून करावी लागते आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात विदेशी चलन खर्चावे लागते. डिझेलला गुडबाय म्हणा आणि त्याचा वापर थांबवा, अन्यथा आम्ही कर इतका वाढवू की डिझेल गाड्या विकणे कठीण होईल, असा इशाराही त्यांनी दिला.
डिझेलवर चालणाऱ्या जनरेटरवरही अतिरिक्त जीएसटीचा प्रस्ताव ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. ऑटोमोबाइलवर सध्या 28 टक्के जीएसटी कर आकारला जातो, आणि वाहनाच्या प्रकारानुसार 1 टक्के ते 22 टक्के अतिरिक्त उपकर आकारला जातो.
नंतर घूमजाव
डीझेल वाहनांवरील अतिरिक्त कराविषयी केलेल्या वक्तव्यावरून नंतर गडकरी यांनी घूमजाव केले. तसा कुठला प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी सोशल मीडियावरून दिले. अर्थात, प्रदूषण कमी करण्यासाठी पर्यायी इंधनांचा अवलंब करण्याच्या भूमिकेचे त्यांनी जोरदार समर्थन केले.