येरवडा (प्रतिनिधी)- विमानतळ रस्त्यावर टिंगरे नगर येथे बेशुद्धावस्थेत असलेल्या एका अनोळखी व्यक्तीस विश्रांतवाडी पोलिसांनी वेळीच उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केल्याने त्या इसमाचे प्राण वाचले. त्या व्यक्तीसाठी पोलीस देवदूत बनल्याने पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दि.७ रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पोलीस नियंत्रण कक्षास येथे एका महिलेने फोन करून सांगितले की विमानतळ रस्ता लेन नंबर सहा टिंगरे नगर येथे एक इसम हा बेशुद्ध अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडला आहे. असा कॉल टिंगरे नगर मार्शल ला मिळाल्याने ताबडतोब पोलिस हवालदार चंद्रशेखर खोत, पोलिस शिपाई योगेश चांगण, सुशांत रनवरे, पोलिस नाईक अजित टेंभेकर असे त्या ठिकाणी पोहचले.
एक अनोळखी इसम बेशुद्ध अवस्थेत होता. त्याला ताबडतोब उठवून बसून पाणी पाजण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने काहीही प्रतिसाद न दिल्याने पोलिस हवालदार खोत यांनी ताबडतोब 108 नं ला फोन करून ऍम्ब्युलन्स बोलाविली. त्या इसमास ससुन हॉस्पिटल येथे उपचारासाठी पाठवले. तेथे त्याला डॉक्टनी आपत्कालीन कक्षात भरती करून डॉक्टरांनी उपचार सुरु केले. दुसऱ्या दिवशी पोलिसांनी त्या रुग्णाची ससून हॉस्पिटल येथे चौकशी केली असता तेथील डॉक्टरांनी सांगितले की, त्या पेशंटच्या शरीरातील पाणी कमी झाल्याने व पोटात अन्न नसल्याने तो बेशुद्ध झाला होता. त्याला वेळेत उपचार मिळाल्याने त्याचा जीव वाचला आहे. तसेच त्याची कोरोना तपासणी झाली असून कोरोना आजाराचे संसर्ग नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पोलीस त्याच्या नातेवाईकांचा शोध पोलिस घेत आहे. विश्रांतवाडी पोलिसांच्या तत्परतेमुळे त्याचा जीव वाचला असे डॉक्टरांनी सांगितले.