बंगळुरु :- टी-20 क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडणारा सूर्यकुमार यादव एकदिवसीय सामन्यांमध्य मात्र फारसा यशस्वी ठरलेला नाही. हे खुद्द त्यानेही कबुल केले असून या प्रकारच्या क्रिकेटसाठीही मी कठोर मेहनत घेत असून त्यातही आता अत्यंत गंभीरपणे खेळणार आहे, असे मत सूर्यकुमार यादवने व्यक्त केले आहे.
सूर्यकुमार यादव हा भारताचा स्टार टी-20 खेळाडू आहे. मात्र एकदिवसीय सामन्यांत त्याला फारशी चमक दाखवता आलेली नाही. त्याला आशिया करंडक स्पर्धेत चांगली कामगिरी करत एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक स्पर्धेसाठी भारतीय संघात देखील स्थान मिळवण्याची संधी मिळाली आहे.
सर्वजण मला तुझी टी-20 कारकिर्द चांगली सुरू आहे. मात्र एकदिवसीय सामन्यात ते सातत्य राखता आलेले नाही असे म्हणतात. याबाबत मी सध्या कठोर मेहनत घेत आहे. कसून सरावही करत आहे. तसेच कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली यांच्यासह राहुल द्रविड यांच्याशीही सातत्याने संवाद साधत आहे. माझ्या खेळातील चुका दुर करण्याबाबत मी खूपच गंभीर आहे, असे सूर्यकुमार म्हणाला.
क्रिकेटच्या तीनही प्रकारात भिन्न पद्धतीने खेळावे लागते टी-20 प्रमाणे एकदिवसीय सामने खेळायचे नसतात हे मला लक्षात आले आहे व त्यानूसारच सध्या सराव सुरु आहे. एकदिवसीय सामन्यांत सुरूवातीला सावध, त्यानंतर थोडा वेग वाढवत व अखेरच्या षटकांत आक्रमक फलंदाजी करावी लागते हे आता लक्षात आले आहे. मला विश्वास आहे की आशिया करंडक स्पर्धेत मी एकदिवसीय सामन्यांतील अपयश निश्चितच दूर करेन, असा विश्वासही त्याने व्यक्त केला.
परिस्थिती पाहून खेळ करणार…
आशिया करंडक स्पर्धेत फलंदाजीची संधी मिळाली की त्या प्रत्येक संधीचे सोने करण्याचाच प्रयत्न राहील. सामन्याची तसेच संघाची परिस्थिती पाहूनच त्यानुसार खेळण्याचा प्रयत्न करणार आहे. जर मी अखेरच्या दहा षटकात खेळण्यासाठी गेलो तर धावांचा वेग वाढवेन मात्र, त्यापूर्वीच मला फलंदाजीची संधी मिळाली तर त्यावळी टी-20 सारखी वेगवान फलंदाजी करू शकत नाही. तीथे परिस्थितीनुसार खेळावे लागेल, असेही सूर्यकुमार म्हणाला.
पहिल्या दोन सामन्यांसाठी द्रविड अनुपलब्ध…
भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आशिया करंडक स्पर्धेच्या पहिल्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघाबरोबर नसतील, असे बीसीसीआयने सांगितले आहे. प्रशिक्षण शिबिरात खेळाडूंना मार्गदर्शन करत असतानाच द्रविड यांना स्नायुंची दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे. तिसऱ्या सामन्यापासून ते संघाबरोबर असतील, असेही सांगितले जात आहे.