भारतीय संघ रविवारी ऑस्ट्रेलियाकडून एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदाच्या सामन्यात पराभूत झाला. यामुळे भारताला स्पर्धेच्या इतिहासात तब्बल दुसऱ्यांदा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. सलग जिंकत गेले तर एक मोठा परभव ठरलेला असतो. यालाच क्रिकेटच्या परिभाषेत लॉ ऑफ ऍव्हरेजेस असे म्हटले जाते. भारताच्या बाबतीत तर हे अनेकदा घडलेले आहे व रविवारीही तेच चित्र दिसले.
भारतीय संघ पराभूत झाला म्हणजे लगेच त्यांच्यावर टीका सुरू करणे गरजेचे नाही. या संपूर्ण स्पर्धेत भारताने तमाम चाहत्यांना असे आनंदाचे कित्येक क्षण दिले आहेत. खेळात हार जीत असतेच मात्र, मनात कुठेतरी खोलवर जखम झाली आहे की हा पराभव साखळी सामन्यांमध्ये एखाद्या सामन्यात झाला असता तर खूप चांगले घडले असते. तसेच त्या एका पराभवाने आपल्या संघाला नेटमध्ये मेहनत करायला तसेच समोरच्या संघाच्या कमकुवत दुव्यांचा अभ्यास करण्यासाठी प्रवृत्त केले असते.
आपण गाफील राहिलो कारण साखळी फेरीत आपण ऑस्ट्रेलियाला अगदी सहज पराभूत केले होते. मात्र, ऑस्ट्रेलियाचा संघ गाफील राहिला नाही. त्यांनी खेळपट्टीचा, वातावरणाचा, भारतीय संघातील फलंदाज व गोलंदाजांचा गाढा अभ्यास केला व मगच ते मैदानात उतरले. त्यांनी ज्या अफलातून पद्धतीने क्षेत्ररक्षण केले ते झाले नसते तर भारताची धावसंख्या 280 ते 300 दिसली असती. आपण ज्या दयाबुद्धीने त्यांना चौकार बहाल केले ते त्यांनी केले नाहीत. त्यांनी भारताच्या प्रत्येक फलंदाजाला रोहित शर्मा व विराट कोहली वगळता एकेका धावेसाठी संघर्ष करायला लावला.
खेळपट्टी संथ आहे म्हणून त्यांचा कर्णधार पॅट कमिन्सने आपल्यासह सगळेच वेगवान गोलंदाज धिम्यागतीने गोलंदाजी करतील याकडे लक्ष दिले. कारण संथ खेळपट्टीवर चेंडू थोडा थांबून येतो व फलंदाजाला मोठे फटके मारणे सहजासहजी शक्य होत नाही. यंदाच्या स्पर्धेत आपण सलग 10 सामने जिंकलो व अंतिम फेरी गाठली. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाने 8 सामने जिंकत अंतिम फेरीत स्थान मिळवले. त्यांची हीच ताकद आहे मिळालेली एकही संधी ते सोडत नाहीत. विजयासाठी अखेरच्या चेंडूपर्यंत प्रयत्न करतात व याच गोष्टीत भारतीय संघ कायम मागे पडतो.
आता पराभवाचे पोस्टमार्टेम करत राहण्यापेक्षा आपल्या खेळाडूंवरचा विश्वास कायम ठेवून आगामी काळात तरी ते या पराभवातून बोध घेतील असा विश्वास दाखवू. सलग जिंकत जाणेही कधी कधी धोकादायक असते ते या स्पर्धेच्या अंतिम लढतीत दिसून आले त्यामुळे जसे लॉ ऑफ ऍव्हरेजेस ऑस्ट्रलियाने अनेकदा टाळले ते यंदा भारताला टाळता आले नाही निदान भविष्यात तरी ते टाळता यावे अशी अपेक्षा आहे. कर्णधार रोहित शर्मा आहे म्हणून त्याच्यासह संपूर्ण संघाला पराभवाबद्दल दोषे देणे योग्य नाही तर जसे विजेतेपद हे ऑस्ट्रेलियाचे टीमवर्क होते, तसाच भारताचा पराभवही सांघिक पराभव मानला गेला पाहीजे.